ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यात भीषण अपघात घडला आहे.बसचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस ट्रकवर आदळली. या अपघातात 38 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून त्यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केले.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस साओ पाउलोहून निघाली असून त्यात 45 प्रवासी होते, मात्र वाटेत तिचा टायर फुटला आणि नियंत्रण सुटून ट्रकला धडकली. यानंतर एक कारही आली आणि बसला धडकली, ज्यामध्ये तीन प्रवासी होते, ते बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात शनिवारी पहाटे 4च्या सुमारास घडला. मिनास गेराइस अग्निशमन विभागाचे म्हणणे आहे की, हा अपघात महामार्ग BR-116 वर झाला. अपघातानंतरच्या छायाचित्रांमध्ये वाहनाचा ढिगारा दिसत आहे. बसला आग लागल्याचे चित्रही समोर आले असून, त्यात बस जळताना दिसत आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बसचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बस ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला. घटनास्थळावरून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. मिनास गेराइसचे गव्हर्नर रोम्यू झेमा यांनी ट्विटरवर सांगितले की, त्यांनी टिओफिलो ओटोनी येथील BR-116 वर झालेल्या दुःखद अपघातात “पीडितांना मदत करण्याचे आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे” आदेश दिले आहेत.