Apple- अ‍ॅपलला ब्राझील कोर्टाकडून झटका, आता अ‍ॅप स्टोअरशिवायही आयफोनवर अ‍ॅप्स इन्स्टॉल करता येतील!

ब्राझीलच्या एका संघीय न्यायालयाने अॅपलला iOS डिव्हाइस सोबत थर्ड-पार्टी अॅप स्टोअर्स आणि साइडलोडिंगला परवानगी देण्याचा आदेश दिला आहे. सध्याच्या घडीला न्यायालयाने कंपनीला ९० दिवसांची मुदत दिलेली आहे. ही मुदत पूर्ण झाल्यानंतर, अॅपलला दररोज ४०,००० डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच ३४.८३ लाख रुपये इतका दंड भरावा लागेल.

 

कोर्टाने असेही म्हटले आहे की, कंपनीने सध्याच्या घडीला iOS प्लॅटफॉर्मवर कडक नियंत्रण ठेवले आहे. त्यामुळे इतर अॅप डेव्हलपर्सचे नुकसान झालेले आहे. हेच कारण लक्षात घेऊन, आर्थिक संरक्षण प्रशासकीय परिषदेने (केड) कंपनीला अॅपमधील खरेदीशी संबंधित निर्बंध काढून टाकण्याचे आणि पर्यायी पेमेंट सिस्टमला परवानगी देण्याचे आदेशही दिले होते. सदर निर्णय फेडरल रीजनल कोर्टाचे न्यायाधीश पाब्लो झुनिगा यांनी दिला असून, ब्राझीलच्या अँटीट्रस्ट नियामक CADE ने लादलेले निर्बंध त्यांनी पुन्हा लागू केले. ब्राझीलच्या न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या CADE ने Apple वर iOS अॅप मार्केटमधील स्पर्धा रोखण्याचाही थेट आरोप केला होता.

ब्राझिलियन प्रकाशन व्हॅलर इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, अॅपलने इतर देशांमध्ये अशा नियमांचे पालन केले आहे आणि त्यामुळे कंपनीच्या व्यवसाय मॉडेलला कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. त्यामुळेच अॅपलला आता थर्ड-पार्टी अॅप स्टोअर्सना iOS वर ऑपरेट करण्याची परवानगी द्यावी लागेल. म्हणजेच वापरकर्ते फक्त अॅप स्टोअरपुरते मर्यादित राहणार नाहीत आणि इतर स्टोअरमधून देखील अॅप्स डाउनलोड करू शकतील. याशिवाय, कंपनीला साइडलोडिंग सुविधा देखील प्रदान करावी लागेल. अ‍ॅपलने मात्र या निर्णयावर आक्षेप घेतला असून, कंपनी या आदेशाविरुद्ध अपील करण्याची योजना आखत आहे.