कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक, पोलीस अधिकारी निलंबीत

कॅनडामध्ये ब्रॅम्पटनमध्ये रविवारी हिंदू मंदिरावर खलिस्तान्यांनी हल्ला केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या खलिस्तानी समर्थकांमध्ये पोलीस अधिकारी सार्जेंट हरिंदर सोही याला सोमवारी निलंबित केले आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

हरिंदर सोही 18 वर्षांपासून पोलीस आहे. त्याने या निदर्शनावेळी खलिस्तानी झेंडा हातात पकडल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या दरम्यान लोकं हिंदुस्थान विरोधी घोषणा देत होते. सोही म्हणाले की, त्यांना सोशल मीडियावर धमक्या देण्यात आल्या. पील प्रादेशिक पोलीस संघटनेने त्यांना “सहाय्य आणि संरक्षण” देऊ केले आहे. ब्रॅम्पटनमध्ये खलिस्तान्यांनी मंदिरात घुसून हिंदू भाविकांना लाठीकाठ्यांनी मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. कॅनेडीओन पोलिसांनी सोमवारी तीन आरोपींना अटक केली आहे. मंदिराबाहेबर तैनात असलेल्या पोलिसांनीही हिंदू भाविकांना मारहाण केली होती. पोलिसांनी आरोपपत्रात या हल्ल्याला केवळ निदर्शन म्हंटले होते. त्यात खलिस्तान्यांच्या गर्दीचा उल्लेख केला नव्हता.

कॅनडातील ब्रॅम्पटन येथील मंदिरावरील हल्ल्याचा हिंदुस्थानी सरकारने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, सरकार कॅनडामधील हिंदुस्थानी नागरिकांच्या सुरक्षेबाबत अत्यंत चिंतेत आहे. ब्रॅम्पटन आणि ओंटारियो येथील हिंदू मंदिरात खलिस्तान्यांनी केलेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. सर्व प्रार्थनास्थळे अशा हल्ल्यांपासून सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी आम्ही कॅनडा सरकारला आवाहन करतो. या  हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कारवाई केली जाईल अशी आम्ही आशा करतो.