
तेव्हा शेणाचे गोळे आणि आता सेन्सॉरची कात्री… महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ हा हिंदी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात 12 बदल सुचवले आहेत. मात्र चित्रपटात कोणतेही बदल केले जाणार नाहीत, अशी भूमिका दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी घेतली आहे, तर सेन्सॉर बोर्डाविरोधात पुण्यात फुलेवाडा येथे वंचित बहुजन आघाडीने आज उग्र निदर्शने केली. त्यामुळे ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी महाराष्ट्रात वादाचा ट्रेलर पाहायला मिळत आहे.
चित्रपट आहे तसाच दाखवणार, अनंत महादेवन ठाम
‘फुले’ चित्रपटात आपण इतिहासाचा विपर्यास केलेला नाही. त्यात दाखविलेले प्रसंग काल्पनिक नाहीत. केवळ ते नाट्यपूर्णपणे मांडले आहेत. या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद गैरसमजातून असून ते शमविण्याकरिता मी 15 दिवसांचा वेळ घेत प्रदर्शन पुढे ढकलले आहे. 25 एप्रिलला चित्रपट कुठल्याही बदलाविना आहे तसाच प्रदर्शित केला जाईल, अशी स्पष्ट भूमिका दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी घेतली आहे.
जाती निर्मूलन, स्त्री शिक्षण यांकरिता संघर्ष करणाऱ्या फुले दाम्पत्यावरील या चित्रपटात ब्राह्मणांचे चुकीचे चित्र रेखाटण्यात आल्याचा आक्षेप घेत ब्राह्मण महासंघाने चित्रपटात बदल करण्याची जोरदार मागणी लावून धरली आहे, परंतु चित्रपटात कुणालाही कमी लेखलेले नाही. एका ट्रेलरवरून तुम्ही हा निष्कर्ष काढू शकत नाही. उलट ब्राह्मणांनी जोतिबा आणि सावित्रींना शाळेसाठी भिडे वाड्याची जागा दिली होती. आपण ब्राह्मण असूनही जागा दिली, त्याबद्दल फुल्यांनी त्यांचे आभार मानले होते. त्यावर आपण इतके महान कार्य करायला जात आहात, तर ब्राह्मण का नाही साथ देणार, असे उत्तर ब्राह्मणांनी दिले होते. याचे संदर्भ चित्रपटात असून तो पाहिल्यानंतर सगळ्या शंका दूर होतील, असे उत्तर देत महादेवन यांनी चित्रपटाची बाजू उचलून धरली आहे.
शाम बेनेगल यांनी 1986 मध्ये बनविलेल्या ‘भारत एक खोज’मध्ये जोतिबा आणि सावित्रीबाईंवर एक एपिसोड होता. त्यातही दोन मुले फुले दाम्पत्यावर शेण फेकताना दाखविले होते. जे झाले तेच आम्हीदेखील दाखविले आहे. मोठ्या ब्राह्मणांचे वय कमी करून त्यांना लहान मूल करून दाखविलेले नाही. चित्रपटाला विरोध कुणी जाणीवपूर्वक करत नसावा. त्यांचा गैरसमज झाला असावा. कारण विरोधकांनाही फुल्यांवर चित्रपट बनावा असे वाटत आहे. वाद निर्माण करणाऱ्यांनी हा सिनेमा बनविल्याबद्दल माझे आभार मानले. फक्त काही गोष्टींवर त्यांचा आक्षेप आहे, पण पूर्वग्रह न ठेवता चित्रपट पहिल्यानंतर तुमचे गैरसमज दूर होतील आणि आपण (ब्राह्मण) आणि ते (फुले) आयुष्यभर एकत्रच होतो हे तुमच्या लक्षात येईल, असे सांगत त्यांनी हा वाद शमविण्याचा प्रयत्न केला. मात्र गैरसमज दूर करण्याकरिता मी स्पेशल शो करणार नाही. कारण मी काहीच चुकीचे दाखविलेले नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी घेतली आहे.
चित्रपटाचे नाव ‘फुले’ का?
चित्रपटाचे नाव आम्ही महात्मा फुले, जोतिबा फुले किंवा सावित्रीबाई फुले असे मुद्दाम ठेवलेले नाही. तुम्ही महात्मा फुले असे नाव का ठेवले नाही, अशी विचारणा मला एकाने केली. मला त्यातून त्यांचे अवमूल्यन करायचे नाही. फुले हे एकच आहेत. जोतिबा आणि सावित्री दोन्हीही फुलेच आहेत. त्यांना तुम्ही वेगळे करू शकत नाही. म्हणून या चित्रपटाचे नाव ‘फुले’ आहे. जोतिबा हे भारताचे पहिले महात्मा होते. ते आम्ही चित्रपटात अत्यंत सुंदरपणे साकारले आहे, असे अनंत महादेवन म्हणाले.
ब्राह्मण स्वतःच्या जातीला कमी कसे लेखेल
मी स्वत ब्राह्मण असून सावित्रीबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री पत्रलेखा हीदेखील ब्राह्मण आहे. ब्राह्मणांनी मिळून जोतिबा आणि सावित्रीबाईंवर चित्रपट बनवला आहे, याला तुम्ही सलाम केला पाहिजे. ब्राह्मण स्वतःच्या जातीला कमी लेखणार नाहीत, परंतु इतर जातींना न्याय द्यायलाही मागेपुढे पाहणार नाही, असे अनंत महादेवन म्हणाले.
सकारात्मक गोष्टी आहेत त्याही दाखवा, ब्राह्मण महासंघाची भूमिका
‘फुले’ चित्रपटाबद्दल आक्षेप म्हणण्यापेक्षा ज्या सकारात्मक गोष्टी आहेत, त्याही दाखवायला हव्यात. फुलेंना ब्राह्मणांनी काही प्रमाणात विरोध केला, पण त्यांच्या कार्याचे समर्थन करणारे ब्राह्मणही होते. शाळेसाठी जागा, देणगी, शिक्षक आणि विद्यार्थी दिले. या चांगल्या गोष्टी चित्रपटात दाखवल्या आहेत की नाही, हा आमचा प्रश्न असल्याची भूमिका ब्राह्मण महासंघाने घेतली आहे. हा चित्रपट जातीयतेला खतपाणी घालणारा असल्याचा आरोप महासंघाने केला.
महात्मा फुलेंच्या समाजसुधारणेच्या चळवळीत योगदान देणाऱ्या ब्राह्मणांना चित्रपटात दुर्लक्षित करण्यात आल्याचे ब्राह्मण महासंघाचे म्हणणे आहे. त्यामुळेच चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्याशी आमचा संवाद झाला आहे. ज्या सकारात्मक गोष्टी आहेत, त्याही दाखवायला हव्यात. जसे भिडे वाड्यात शाळा सुरू झाली, शाळेला देणगी दिली, विद्यार्थी दिले, असे आम्ही त्यांना सांगितले. त्यावर चित्रपट एकांगी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी आम्हाला 15 दिवस लागतील, असे त्यांनी सांगितल्याचे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.
अनंत महादेवन यांनी चित्रपटाचे प्रदर्शन दोन आठवडे पुढे ढकलल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केलेले आहे. आम्ही सुचवलेले बदल ते करतील अशी अपेक्षा आहे, असे ब्राह्मण महासंघाने नमूद केले.
जातीद्वेष टाळा
ट्रेलरमध्ये एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाईंवर चिखल फेकताना दाखवला आहे. ते दाखवण्याची गरज नाही असे वाटते. तरीही तो निर्मात्यांचा अधिकार आहे. पण शाळा घेताना फुलेंना एखादा ब्राह्मण मदत करतोय असं एखादं दृष्य दाखवायला काय हरकत होती. ते न दाखवणं ही बाब जातीय द्वेषाकडे घेऊन जाणारी आहे, अशी भूमिका ब्राह्मण महासंघाने घेतली आहे.
सेन्सॉर बोर्डाविरोधात फुले वाड्याबाहेर आंदोलन
‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याने पुण्यात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली. ‘फुले’ सिनेमा जसा आहे, तसा दाखवा, अन्यथा सेन्सॉर बोर्ड सदस्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ‘वंचित’ने पुण्यात फुले वाड्यासमोर आंदोलन करत दिला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकीकडे महात्मा फुलेंना अभिवादन करत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या कार्यावर आधारित चित्रपटाला विरोध होत असेल, तर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. काही वर्ग असा आहे, काही समूह असे आहेत की, त्यांना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्यामध्ये जळजळतेय. त्यांचा विरोध चाललेला आहे.
‘फुले’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सॉर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सॉर बोर्डाचे जे सदस्य आहेत, त्या सदस्यांच्या घरासमोर आम्ही निदर्शने केल्याशिवाय राहणार नाही. महात्मा फुलेंचे समग्र वाङ्मय सरकारनेच प्रकाशित केले आहे. त्यावर आधारित दृश्ये काढायला सांगणे म्हणजे विचारस्वातंत्र्यावर गदा आणणे आहे. सेन्सॉर बोर्डाची विचारसरणी चालणार नाही, तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे हीच या देशांमध्ये राबवली जाईल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले, त्या प्रवृत्तींनी पुन्हा डोके वर काढले – हर्षवर्धन सकपाळ
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा व वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. परंतु फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले, त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा एकदा डोके वर काढले आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
फुले दाम्पत्याने मुलींची पहिला शाळा काढली त्या वेळी सावित्रीबाई फुलेंवर दगड फेकणारे, शेण फेकणारे विदेशातून आले नव्हते. महिला शिकली तर धर्म बुडेल या विचाराच्या लोकांनीच त्यांना छळले. आता ‘फुले’ चित्रपटातून तो भाग वगळावा असे सेन्सॉर बोर्ड सांगत आहे, ही लपवाछपवी कशासाठी? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ते पुढे म्हणाले, मंत्री चंद्रकांत पाटील आज फुले वाड्यावर बोलताना म्हणाले की, पूर्वी तसे होत होते, पण आता होत नाही. संविधानामुळे ते होत नाही, पण चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाला हे मान्य आहे का? भाजपसाठी गोळवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट’ हे बायबल आहे, त्यात महिला शिक्षणाला थारा नाही. चातुर्वर्ण्याबरोबर पाचवा वर्ण महिला सांगितलेला असून महिलांना अतिशुद्र म्हटले आहे ते चंद्रकांत पाटील यांना मान्य आहे का? असा प्रश्न सपकाळ यांनी केला.