पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून संताप अनावर, पतीच्या मारहाणीत प्रियकराचा मृत्यू

दिल्लीत एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. पत्नीला परक्या पुरुषासोबत खोलीत पाहून पतीला संताप अनावर झाला. यानंतर संतप्त पतीने प्रियकराला बेदम चोप देत त्याला शारीरिक यातना दिल्या. यात प्रियकराचा मृत्यू झाला. ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क येथे ही घटना घडली. रितिक वर्मा असे मयत तरुणाचे नाव आहे.

आरोपीच्या पत्नीचे मयत रितिक वर्मासोबत गेल्या दोन महिन्यांपासून विवाहबाह्य संबंध होते. सोमवारी सकाळी आरोपी घरी आला असता त्याने पत्नीला रितिकसोबत पाहिले. यानंतर त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने दोघांनाही बेदम मारहाण केली. रितिकच्या बोटाची नखेही उखडली.

गंभीर जखमी अवस्थेत नातेवाईकांनी रितिकला रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रितिक हा टेम्पो चालक होता. तसेच आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.