रद्द तिकीट घेऊन प्रेयसीला सोडायला विमानतळावर आला

रद्द केलेले तिकीट घेऊन प्रेयसीला सोडण्यासाठी प्रियकर विमानतळावर आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार हे सीआयएसएफमध्ये उपनिरीक्षक म्हणून काम करतात. शनिवारी ते डय़ुटीसाठी विमानतळावर आले. गेट क्रमांक 3 येथे त्याची डय़ुटी होती. गेट क्रमांक 3 येथून प्रवेश करणाऱया प्रवाशांची तिकिटे आणि कागदपत्रे तपासून प्रवाशांना आत सोडले जाते. जे प्रवासी अचानक प्रवास करण्याचे टाळतात, अथवा काही कारणामुळे ज्यांना प्रवास करू दिला जात नाही अशांची नावे विमान कंपन्यांकडून आल्यावर त्याची गेट क्रमांक 3 आणि 6 येथे नोंद होते. त्यानंतर त्या प्रवाशाला बाहेर सोडले जाते.

रविवारी पहाटे खासगी विमान कंपनीचा प्रतिनिधी याने एका प्रवाशाबाबत तक्रारदार यांना माहिती दिली. त्या प्रवाशाचे विमान तिकीट रद्द झाले असून त्याला बाहेर सोडायचे असल्याचे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने ते कर्मचारी प्रवाशाला घेऊन तक्रारदार यांच्याकडे आले. त्यानंतर तक्रारदार याने त्या प्रवाशाला कुठून कुठे प्रवास केल्याबाबत विचारले. तेव्हा त्याने पॅरिस येथे जाण्यासाठी गेट क्रमांक 7 येथून प्रवेश केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला तिकीट दाखवण्यास सांगितले. त्याने मोबाईलमध्ये विमानाचे तिकीट दाखवले. ते तिकीट प्रवासाच्या तीन दिवस अगोदरच रद्द करण्यात आले होते.