कदाचित बॉक्सिंग डे कसोटीच रोहितची अखेरची कसोटी; सुनील गावसकर-रवी शास्त्री यांचे मत

ऑस्ट्रेलियातील अपयशी कामगिरीमुळे हिंदुस्थानच्या ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. ‘जर-तर’च्या समीकरणांवर गणित येऊन ठेपल्याने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमी निराश झाले आहेत. त्यातच सिडनी कसोटीतून रोहित शर्माने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेट विश्वात त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. जर हिंदुस्थान जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र झाला नाही तर मेलबर्नच्या मैदानावर झालेली बॉक्सिंग डे कसोटी रोहितची कदाचित शेवटची कसोटी असेल, असे मत हिंदुस्थानचे माजी कर्णधार, समालोचक सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. रोहितला मेलबर्नवर आम्ही शेवटच्या वेळी कसोटी खेळताना पाहिले असावे, असेही ते म्हणाले.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरण्यासाठी हिंदुस्थानचे भवितव्य श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेवर अवलंबून आहे. सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर (बॉगाक) ट्रॉफी मालिकेत हिंदुस्थान 1-2 ने पिछाडीवर असून करंडक कायम राखण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हिंदुस्थानला सिडनी कसोटी जिंकावीच लागणार आहे. जर पराभव झाला तर हिंदुस्थानच्या डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या आशा संपुष्टात येतील.

सततची निराशा रोहितच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे त्याने पाचव्या कसोटीत न खेळता शुबमन गिलला संधी देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाबद्दल पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान लंच ब्रेकमध्ये गावसकर म्हणाले, ‘जर हिंदुस्थान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्र झाला नाही तर मेलबर्न टेस्ट ही रोहितची कदाचित शेवटची कसोटी असू शकते.’

तसेच रवी शास्त्री म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही धावा काढत नाही, तुमच्या खेळातील सातत्य टिकवू शकत नाही आणि मानसिकदृष्टय़ा तुम्ही तिथे नसता तेव्हा असे घडते. या सामन्यात रोहितने बाहेर राहण्याचे मान्य केले. हा कर्णधाराचा धाडसी निर्णय आहे. जर देशांतर्गत हंगाम सुरू झाला असता तर त्याने खेळण्याचा विचार केला असता. पण मला वाटते की या कसोटीनंतर तो याबाबतची घोषणा करेल. रोहित तरुण नाही आणि हिंदुस्थानात तरुणांची कमतरता आहे असेही नाही.