जागतिक कसोटी अजिंक्यपदासाठी बॉक्सिंग, मालिकेत आघाडी घेण्यासाठी उभय संघांची जोरदार तयारी

कसोटी जगतातील सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि लोकप्रिय कसोटी असलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला उद्यापासून हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) धुमश्चक्री सुरू होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या लॉर्ड्सवर रंगणाऱ्या अंतिम सामन्यासाठी आपले स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने बॉर्डर-गावसकर (बॉगाक) करंडकातील चौथ्या कसोटी सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. जो या बॉक्सिंगमध्ये विजयाचा ठोसा लगावेल, तोच आपले आव्हान कायम राखेल. म्हणजेच जो हार गया समजो मर गया.

हिंदुस्थानने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पहिल्या पर्थ कसोटीत पराक्रम केला. जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या या कसोटीत हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव करत सनसनाटी सुरुवात केली होती. या कसोटीत बुमराच विजयाचा खरा शिल्पकार होता तर यशस्वी जैसवालने आपल्या बॅटची कमाल दाखवत त्याला उत्तम साथ दिली होती. मात्र दुसऱ्या कसोटीत हिंदुस्थान पूर्ण ताकदीनिशी म्हणजे कर्णधार रोहित शर्माच्या उपस्थितीत खेळला, पण या कसोटीत रोहित शर्मासह सर्वच दिग्गज फलांदाजांनी घोर निराशा केली.

परिणामतः हिंदुस्थानला 10 विकेटच्या लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. तिसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व होते, पण आकाशदीप आणि जसप्रीत बुमराने दहाव्या विकेटसाठी केलेल्या 47 धावांच्या झुंजार भागीने हिंदुस्थानवर लटकत असलेली फॉलोऑनची टांगती तलवार दूर केली. याच झुंजार खेळामुळे हिंदुस्थानने केवळ फॉलोऑनच वाचवला नाही तर कसोटी पराभवही टाळला. या थरारक निकालामुळे हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया दोघेही आता एकाच रेषेत धावत आहेत. मेलबर्न कसोटीत जिंकेल त्याला मालिकेत आघाडी घेण्याची पुन्हा एकदा संधी लाभेल.

कसोटी अजिंक्यपदासाठीची झुंज

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत कोणते दोन संघ धडक मारणार हे अद्याप निश्चित नाही. या शर्यतीत सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ आघाडीवर असला तरी त्याचे स्थानही डळमळीत होऊ शकते. हिंदुस्थानला अजिंक्यपदाच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखण्यासाठी मेलबर्न आणि सिडनी कसोटीवर विजयाचा झेंडा रोवावाच लागणार आहे. इथे पराभवाला माफी नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने या मालिकेत मिळवलेला आणखी एक विजय हिंदुस्थानचे लॉर्ड्सवरच्या फायनलचे स्वप्न भंग करू शकतो. गेल्या दोन्ही अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत हिंदुस्थानचाच संघ खेळला होता आणि हरला होता. या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेलाही अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे.

पाकिस्तानविरुद्ध ते दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून यापैकी एकही कसोटी विजय त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळवून देऊ शकतो. मात्र पाकिस्तानने दोन्ही कसोटीत विजय मिळवण्याचा पराक्रम केला तर ते अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीचे सर्व अंदाज फोल ठरवतील. सध्या जरतरचेच अंदाज बांधले जात आहेत. प्रत्यक्ष निकालानंतरच लॉर्ड्सवर खेळणारे दोन संघ निश्चित होतील.

रोहित शर्मा-विराट कोहलीची शेवटची बॉक्सिंग…?

रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी बॉर्डर-गावसकर करंडक अत्यंत महत्त्वाची होती. आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेल्या या दिग्गज फलंदाजांकडून ऑस्ट्रेलियन भूमीवर धावांचा पाऊस अपेक्षित होता. विराटने पर्थ कसोटीत शतकी खेळी केली असली तरी पुढील दोन्ही कसोटींत ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूवर त्याला फसवण्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाज वारंवार यशस्वी ठरल्यामुळे त्याच्या कारकीर्दीची घटका भरत आल्याचे बोलले जात आहे.

रोहितचीही अपयशाची मालिका संपण्याची चिन्हे धुसर झाल्यामुळे ही मालिकाच त्यांच्या कसोटी क्रिकेटची अखेरची मालिका ठरणार, अशी शक्यता आतापासून वर्तवण्यात आली आहे. जर त्यांच्या बॅटने उर्वरित दोन्ही कसोटींत चमत्कार नाही दाखवला तर हिंदुस्थानी संघाचे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीतूनही आव्हान संपुष्टात येईल आणि या दोघांची कसोटी कारकीर्दही संपुष्टात येईल. त्यामुळे नव्या वर्षाच्या प्रारंभी हिंदुस्थानी संघाला आनंदाचे क्षण अनुभवायचे असतील तर रोहित आणि विराटला मेलबर्नच नव्हे तर सिडनीतही आपला खेळ दाखवणे क्रमप्राप्त आहे. आता हिंदुस्थानी संघाला आणि त्यांना त्यांची फलंदाजीच वाचवू शकते,

बॉक्सिंग डे कसोटी संभाव्य संघ

हिंदुस्थान ः यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया ः उस्मान ख्वाजा, सॅम कोनस्टास, मार्नस लाबुशन, स्टीव्हन स्मिथ, ट्रक्हिस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलॅण्ड.