महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीच्या दिशेने

महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी 50 व्या कुमार-कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील साखळी सामन्यात सलग दोन विजय मिळवीत बाद फेरी गाठण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. ‘ग’ गटात महाराष्ट्राच्या मुलींनी चंदिगडला 51-47 असे रोखत बाद फेरी गाठण्याचा आपला मार्ग मोकळा केला. याचबरोबर मुलांच्या ‘इ’ गटात महाराष्ट्राने कर्नाटकला 33-22 असे रोखत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले.

हरिद्वारमधील रोशनबाग बंदिस्त क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. आजच्या सायंकाळच्या सत्रातील ‘ग’ गटात महाराष्ट्राच्या मुलींनी चुरशीच्या लढतीत चंदीगडला 51-47 असे रोखत बाद फेरी गाठण्याचा आपला मार्ग मोकळा केला. पहिल्या डावापासून रंगतदार ठरलेल्या या सामन्यात विश्रांतीला 22-18 अशी आघाडी महाराष्ट्राकडे होती. मध्यांतरानंतरच्या खेळात आहे ती आघाडी निसटू न देता महाराष्ट्राने आपला विजय निश्चित केला. वैभवी जाधव, वैष्णवी काळे यांच्या संयमी दमदार चढाया त्यांना साक्षी गायकवाडची मिळालेली बचावाची साथ याने हा विजय मिळविला. महाराष्ट्रा च्या मुलींची साखळीतील शेवटची लढत उत्तरांचल संघाशी होईल. आज सकाळी झालेल्या कुमारी ‘ग’ गटात महाराष्ट्राने मणिपूरचा 52-30 असा पराभव करीत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात 31-14 अशी आघाडी घेणाऱया महाराष्ट्राने उत्तरार्धात सावध खेळावर भर देत गुणांचे अर्धशतक पार केले. साक्षी रावडे हिचा अष्टपैलू खेळ तिला वैष्णवी जाधवची मिळालेली चढाईची, तर सृष्टी मोरेची मिळालेली पकडीची साथ यामुळे 18 गुणांनी महाराष्ट्राने सामना आपल्या बाजूने झुकविला.

सायंकाळच्या सत्रात मुलांच्या ‘इ’ गटात महाराष्ट्राने कर्नाटकला 33-22 असे रोखत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले. विश्रांतीला 23-11 अशी आघाडी घेणाऱया महाराष्ट्राला विश्रांतीनंतर कर्नाटकने विजयासाठी चांगलेच झुंजविले, मात्र पहिल्या डावातील आघाडीमुळे महाराष्ट्राने हा विजय साकारला. अनुज गावडे, समर्थ देशमुख, महेश मोने यांच्या खेळामुळे महाराष्ट्राने 11 गुणांच्या फरकाने विजय मिळविला.