पावणे नऊ लाख रुपयांचे हेरॉईन तस्करीप्रकरणी एकाला बोरिवली पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. परवेझ अन्सारी असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बोरिवली परिसरात काही जण हेरॉईन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पोलिसांनी पडताळली. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, उपनिरीक्षक इंद्रजित पाटील, निंबाळकर, फर्डे, भोई आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी रविवारी रात्री सुधीर फडके उड्डाण पूल येथे सापळा रचला. रात्री परवेझ तेथे आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 87 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे पावणे लाख रुपये इतकी आहे. परवेझ हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी असून तो सध्या नालासोपारा येथे राहतो. त्याला ते हेरॉईन कोणी दिले होते याचा तपास पोलीस करत आहेत.