ड्रग्जचा सूत्रधार अखेर गजाआड

बुटातून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या सूत्रधार मोहम्मद अली याला अखेर बोरिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रुरकी, हरिद्वार, सिकरोडा, भगवानपूर, देहरादून, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या ठिकाणी 9 दिवस गेले होते. अखेर मोहम्मदला कुल्लू मंडी येथून अटक केली.

जानेवारी महिन्यात बोरिवली पोलिसांनी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली होती. त्याच्याकडून 472 ग्रॅम हेरॉईन जप्त केले होते. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे 50 लाख रुपये होती. ती टोळी बुटातून ड्रग्ज तस्करी करत होती. तपासादरम्यान पोलिसांना या टोळीचा सूत्रधार मोहम्मद अलीची माहिती मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर आदींच्या पथकाने तपास सुरू केला. अखेर पोलिसांना मोहम्मद अलीची माहिती मिळाली. तो कुल्लू मंडी येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी कुल्लू मंडी येथे सापळा रचून मोहम्मद अलीच्या मुसक्या आवळल्या.