बोरिवलीत 22 मजली इमारतीला आग; वृद्धाचा मृत्यू, तीन जखमी

बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो रेल स्थानकाजवळ असलेल्या 22 मजली निवासी इमारतीला आज दुपारी आग लागली. शॉर्ट सर्किट होऊन मीटर बॉक्सला आग लागली. ही आग पहिल्या ते सहाव्या मजल्यापर्यंत पसरली. त्यात 70 वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. बोरिवली-मागाठाणे येथील मेट्रो स्थानकाजवळ कनाकिया समर्पण ही 22 मजल्याची टोलेजंग इमारत आहे. इमारतीच्या मीटर बॉक्सला सुमारे साडेबारा वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. बाहेर तुफान पाऊस सुरू असतानाही सोसाटय़ाच्या वाऱयामुळे ही आग पसरली. घाबरलेले रहिवासी इमारतीबाहेर पळाले. मात्र आग आणि पसरलेल्या धुरामुळे चार जण इमारतीमध्येच अडकून पडले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जवानांनी चार जणांना बाहेर काढले आणि जवळच्या अॅपेक्स रुग्णालयात दाखल केले. यातील महेंद्र शहा यांना डॉक्टरांनी दाखल करताच मृत घोषित केले तर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.