
सहलीहून परतणाऱ्या लगड कुटुंबावर काळाचा घाला पडला. विरुद्ध दिशेने सुसाट येणाऱ्या ट्रकने समोरील पाच गाड्यांना चिरडले. ही धडक इतकी भीषण होती की त्यात तीन जण जागीच ठार तर बारा जण जखमी झाले. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये लगड कुटुंबातील बाप-लेकीचा समावेश असून त्यांची नावे नीलेश लगड (42), श्राव्या लगड (12) अशी आहेत, अन्य मृताचे नाव प्रिया इंदुलकर असे आहे.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात वाघजाई मंदिर परिसरात व मंदिराजवळील रस्त्यावरून एक भरधाव ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाला होता. वाघजाई मंदिराजवळ या सुसाट ट्रकने समोरून येणाऱ्या रिक्षा, इनोव्हा कार, एर्टिगा कार, टाटा पंच आणि आयआरबीचे दुरुस्ती वाहन अशा पाच गाड्यांना अक्षरशः चिरडले. धडक दिल्यानंतर हा ट्रक बाजूच्याच डोंगरावर जाऊन वेगाने आदळला. या अपघातातील एर्टिगा कारमधील लगड कुटुंब अलिबाग येथून सहल आटपून लोणावळ्याच्या दिशेने निघाले होते. एर्टिगा कारमधील बाप-लेक असलेले दिनेश लगड आणि श्राव्या लगड यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य प्रवासी प्रिया इंदुलकर यांचाही अपघातात बळी गेला.
या अपघातात शरयू लगड (38), अर्श लगड (5), अर्शित लगड (5), अंशिका मोगल (9), आरव मोगल (6), सागर इंदुलकर (42), रुद्र इंदुलकर (3) हे गंभीररीत्या जखमी झाले तर विवेक पाटील (45), मिताली केरकर (45), संजय वालेकर (41), विमल वालेकर (69), अश्विनी जाडकर (43), जिग्नेश जाडकर (12) हे किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने लोणावळा येथील संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चालकाची चुकी की ब्रेक फेल?
या घटनेनंतर बोरघाट पोलीस आणि खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत करण्यात आली. प्रचंड वेगाने धडक देणाऱ्या ट्रकचालकाची ही चुकी होती की ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडली याचा तपास लोणावळा पोलीस करीत आहे.