Border Gavaskar Trophy 2024 – मेलबर्न कसोटीपूर्वी टीम इंडियात मोठा फेरबदल, अश्विनच्या जागी मुंबईच्या अष्टपैलू खेळाडूची निवड

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 26 डिसेंबर पासून मेलबर्न येथे चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना अनिर्णीत सुटल्यामुळे सध्या मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे पुढील दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. असे असतानाच टीम इंडियाच्या संघात पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी मुंबईचा अष्टपैलू खेळाडू तनुष कोटियन याची निवड करण्यात आली आहे.

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने गॅबा कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे त्याच्या जागेवर मुंबईचा अष्टपैलू खेळाडू तनुष कोटियनची उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघात निवड करण्यात आली आहे. 26 वर्षीय तनुष कोटीयन फिरकीपटू असून एक चांगला फलंदाज सुद्धा आहे. तनुषने 2018-19 या वर्षी रणजी सामन्यांच्या माध्यमातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

तनुषने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले असून 33 सामने खेळले आहेत. तसेच 25.70 च्या सरासरीने 101 विकेट त्याने आतापर्यंत घेतल्या असून तीन वेळा पाच विकेट घेण्याची किमया सुद्धा त्याने साधली आहे. फलंदाजीमध्ये सुद्धा त्याने चमकदार कामगिरी करत 2 शतके आणि 13 अर्धशतके झळकावली आहेत. 41.21 च्या सरासरीने 1525 धावा त्याच्या नावावर आहेत. त्याच बरोबर त्याने लिस्ट A मध्ये 20 आणि 33 टी-20 सामने खेळले आहेत.

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच 10 व्या आणि 11 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकण्याचा विक्रम तनुष आणि तुषार देशपांडे यांच्या नावावर आहे. रणजी ट्रॉफीच्या 2023-24 हंगामात त्यांनी ही एतिहासिक कामगिरी केली आहे. बडोदाविरद्ध क्वार्टर फायनलच्या सामन्यात तनुषने 120 धावा आणि तुषार देशपांडे याने 123 धावा केल्या होत्या.