अब तुम्हारे हवाले वतन साथियों, बॉर्डर-गावसकर करंडकाला आजपासून सुरुवात

कर्णधार रोहित शर्मा सुट्टीवर, धडाकेबाज शुबमन गिल जखमी, आधारस्तंभ विराट कोहली आऊट ऑफ फॉर्म आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवामुळे संघाचे मनोधैर्य खचलेले. अशा बिकट परिस्थितीत जसप्रीत बुमरा आपल्या नव्या दमाच्या खेळाडूंसह शुक्रवारपासून सुरू होणाऱया बॉर्डर-गावसकर करंडकातील पहिल्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. संघात काही वरिष्ठ खेळाडू असले तरी ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों…’ ची साद घालत बुमरा पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर हिंदुस्थानला विजयारंभ देण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे ऑप्टसवर अपराजित असलेला ऑस्ट्रेलिया पाहुण्यांना आणखी एक धक्का देण्याच्या ध्येयानेच उतरणार आहे.

हिंदुस्थानचे लक्ष्य – विजयाची हॅटट्रिक

न्यूझीलंडविरुद्धच्या दारुण पराभवाने हिंदुस्थानच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या मार्गात काटे पेरले आहेत. हिंदुस्थानला आता ऑस्ट्रेलियाला पाचपैकी चार सामन्यांत हरवून एक कसोटी अनिर्णित राखावी लागणार आहे. हिंदुस्थानची सध्याची स्थिती पाहता ही अपेक्षा म्हणजे निव्वळ मूर्खपणाची लक्षणे आहेत. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मायभूमीत झालेल्या गेल्या दोन्ही मालिकेत 2-1, 2-1 असे मालिका विजय नोंदविले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सलग तिसऱयांदा त्यांच्या घरच्याच खेळपट्टीवर हरवण्याचे हिंदुस्थानचे ध्येय आहे. तरीही हिंदुस्थानचे पर्थवर कसे पाऊल पडतेय, यावरच मालिकेचा पुढील निकाल अपेक्षित आहे.

विराटला खेळावेच लागेल

हिंदुस्थानी संघातील सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून विराट कोहलीचेच नाव प्रामुख्याने घेतले जातेय. गेल्या पाच वर्षांत विराटच्या बॅटमधून केवळ दोनच शतके निघाली असली तरी त्याला आपले सारे अपयश पुसून काढण्याची नामी संधी ऑस्ट्रेलिया दौऱयात लाभली आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात खेळलेल्या 13 कसोटी सामन्यांत 6 शतके आणि 4 अर्धशतकांच्या जोरावर 1352 धावा केल्या आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी फलंदाजीला बळकटी देण्यासाठी त्याला आपला तोच खेळ पुन्हा एकदा दाखवावाच लागणार आहे.

नव्या गोलंदाजांना संधी

कर्णधार जसरप्रीत बुमरा पर्थच्या ड्रॉप इन खेळपट्टीवर चार गोलंदाजांसह उतरण्याच्या विचारात आहे. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज आहे, पण नीतिश रेड्डी आणि आकाश दीपला खेळविण्याचीही शक्यता आहे. तसेच फिरकीवीर म्हणून रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलूंपैकी एकाची निवड करणे आव्हानात्मक ठरणार आहे. तिघांपैकी कोण बाजी मारेल, हे निश्चितपणे सांगता येत नाही.

ऑप्टसवर ऑस्ट्रेलिया अपराजित

वेगवान माऱयासाठी प्रसिद्ध असलेला पर्थचा वॅका स्टेडियम आता इतिहासजमा झाला आहे. 2017 सालीच या स्टेडियमला निरोप देण्यात आला होता आणि शेजारीच ऑप्टस स्टेडियम उभारण्यात आले होते. विशेष म्हणजे ऑप्टसची खेळपट्टी ड्रॉप इन आहे आणि ती वेगवान गोलंदाजांना पोषक अशीच बनविण्यात आलेली आहे. या नव्या स्टेडियमच्या ड्रॉप इन खेळपट्टीवर 2018 सालीच पहिला सामना झाला आणि तोसुद्धा हिंदुस्थानविरुद्धच. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत विराट कोहलीच्या हिंदुस्थानचा 146 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया गेल्या तीन वर्षात न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध ऑप्टसवर कसोटी खेळलेत आणि जिंकलेतसुद्धा. सलग चार कसोटी विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघ हिंदुस्थानविरुद्ध विजयाचा पंच देतो की गत मालिकेप्रमाणे पाहुणे पहिली कसोटी जिंकतात, ते कसोटी सुरू झाल्यानंतरच कळू शकेल.

जैसवालकडून ‘यशस्वी’ सलामी अपेक्षित

विराट कोहली हिंदुस्थानचा आधारस्तंभ असला तरी सध्या संघात सुपर फॉर्मात फक्त यशस्वी जैसवाल आहे. जैसवालला आपल्या लौकिकानुसार गेल्या पाच कसोटींत मोठी खेळी करता आलेली नाही. मात्र त्याने या वर्षी खेळलेल्या 11 कसोटींत 1119 धावा ठोकल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध त्याने सलग कसोटींत 209 आणि नाबाद 214 या खेळय़ा करत अवघ्या जगाला आपल्या भन्नाट खेळाचे दर्शन घडवलेय. आतापर्यंत तो मायदेशातच खेळला असून परदेशातही त्याची बॅट तळपते हे दाखवून देण्यासाठी ऑस्ट्रेलियन भूमीवरही शतकी झंझावात दाखवून द्यावा लागणार आहे.

राहुलला नवसंजीवनी

हिंदुस्थानी संघात बसतही नसलेला के. एल. राहुल आता संघातही बसलाय आणि तो सलामीलाही उतरणार आहे. त्याला आपले संघातील डळमळीत स्थान स्थिर करण्यासाठी नवसंजीवनी लाभली आहे. रोहित शर्माची अनुपस्थिती आणि गिलच्या अंगठय़ाची दुखापत त्याच्या पथ्यावर पडली आहे. तसेच देवदत्त पडिक्कललाही तिसऱया स्थानावर खेळण्याची संधी लाभणार आहे. या दोघांपैकी कोण आपले पुढच्या कसोटीसाठी संघातील स्थान पक्के करण्यासाठी खेळतो, ते पर्थवर कळेलच.

संभाव्य अंतिम संघ

हिंदुस्थान – यशस्वी जैसवाल, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, ध्रुव जुरेल, नितेशकुमार रेड्डी, जसप्रीत बुमरा (कर्णधार), मोहम्मद सिराज, आकाश दीप.

ऑस्ट्रेलिया – उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रव्हिस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरी, नॅथन लियॉन, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क.

कसोटीची वेळ

सकाळी 7.50 पासून

थेट प्रक्षेपण

स्टार स्पोर्टस् आणि हॉटस्टार