Border Gavaskar Trophy – गाबा कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, सरावा दरम्यान ऋषभ पंतला दुखापत

पर्थ कसोटीमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभाव केला होता. तर एडलेड कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव केला. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-1 अशी बरोबर साधली. तिसरा कसोटी सामना 14 डिसेंबर पासून गाबा येथे सुरू होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू कसून सराव करत आहेत. मात्र सरावा दरम्यान यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला दुखापत झाल्याने टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर रंगणार आहे. याच मैदानावर मागील सामन्यात ऋषभ पंतने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भुमिका पार पाडली होती. त्यामुळे टीम इंडियासाठी ऋषभ पंतची उपलब्धी महत्त्वाची ठरणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया दणक्यात पुनरागन करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. मात्र 10 डिसेंबर रोजी एडलेड येथे सरावा दरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाली आहे. नेटमध्ये सराव करत असताना थ्रोडाउन स्पेशलिस्ट रघूचा सामना करत असताना ऋषभला दुखापत झाली. त्यामुळे त्याने तत्काळ सराव थांबवत वैद्यकीय मदत घेतली. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर त्याने पुन्हा सरावाला सुरुवात केली आहे. परंतु त्याची दुखापत कितपत गंभीर आहे याची माहित अद्याप समजू शकलेली नाही.