गौतम गंभीरचे मुख्य प्रशिक्षकपद धोक्यात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका ठरणार अखेरची?

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पदभार स्वीकारला आणि सलग दोन मालिकांमध्ये टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. श्रीलंकेत वनडे मालिका पराभव आणि घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध तब्बल 24 वर्षांनी कसोटी मालिका पराभव. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. तत्पुर्वी गौतम गंभीर यांच्या मुख्य प्रशिक्षकपदावर टांगती तलवार असल्याची माहिती समोर आली आहे.

टीम इंडियाला जर ICC World Test Championship (WTC) च्या अंतीम फेरीत प्रवेश मिळवायचा असेल, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलियाला 5-0 अशा फरकाने हरवण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली तर टीम इंडियाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चीत होईल. परंतु ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवणे टीम इंडियाला तितकेसे सोपे जाणार नाही. टीम इंडियासोबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी सुद्धा ही एक अवघड परीक्षा असणार आहे. गंभीर यांनी प्रशिक्षक पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर चारच महिन्यात टीम इंडियाचा दोन मालिकांमध्ये पराभव झाला. टीम इंडियाचा हाच खेळ ऑस्ट्रेलियामध्ये कायम राहिला तर गौतम गंभीर यांना पदावरून हटवण्यात येण्याची शक्यता आहे.

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाची कामगिरी पाहून गौतम गंभीर यांना मुख्य प्रशिक्षक पदावर ठेवायचे का नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. सध्या गौतम गंभीर वनडे, टी-20 आणि कसोटी अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. रिपोर्टनुसार, BCCI वनडे, टी-20 आणि कसोटी या तिन्ही फॉरमॅटसाठी स्वतंत्र प्रशिक्षकांची नियुक्ती करण्याच्या विचारात आहे. त्यानुसार कसोटी संघाची जबाबदारी व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या खांद्यावर सोपवली जाऊ शकते. तर वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये गौतम गंभीर यांनाच मुख्य प्रशिक्षकपदावर कायम ठेवण्यात येईल अशी शक्यता आहे.