Border Gavaskar Trophy – विराट कोहलीला इतिहास रचण्याची सूवर्ण संधी, 76 वर्षांपूर्वीचा डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणार?

टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर करंडकातील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिकेची दणक्यात सुरुवात केली आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक ठोकल्याने चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या मालिकेतील अजून चार सामने शिल्लक आहेत. त्यामुळे विराटच्या बॅटमधून अशाच प्रकारची फलंदाजी संघाला आणि चाहत्यांना अपेक्षित आहे. अशाच प्रकारची फलंदाजी विराटने उर्वरित सामन्यांमध्ये केल्यास दिग्गज माजी फलंदाज डॉन ब्रॅडमन यांचा 76 वर्षांपूर्वीच विक्रम मोडला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे दिवंगत माजी फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या फलंदाजीची एकेकाळी जादू होती. आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रमांना त्यांनी गवसणी घातली. त्यांचे काही विक्रम मोडीत निघाले तर काही विक्रम आजही शाबूत आहेत. एकाच देशाविरुद्ध त्यांच्याच घरात जाऊन सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. डॉन ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्ध असा पराक्रम केला होता. डॉन ब्रॅडमन यांनी इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध 19 सामने खेळले असून 2674 धावा करत 11 शतके ठोकली आहेत. 76 वर्षांपूर्वी त्यांनी हा पराक्रम केला होता. त्यांच्यानंतर कोणत्याच फलंदाजाला असा पराक्रम अद्याप तरी करता आला नाही. परंतु हाच विक्रम मोडण्याची विराट कोहलीला आता सूवर्ण संधी आहे.

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना ऑस्ट्रेलियामध्येच आतापर्यंत 43 सामने खेळले असून खणखणीत 10 शतके ठोकली आहेत. म्हणजेच विराट कोहलीली डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी दोन शतकांची गरज आहे. जर विराटने उर्वरित चार कसोटी सामन्यांमध्ये दोन शतके ठोकली तर डॉन ब्रॅडमनचा हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होईल.