पश्चिम बंगालमधील हिंदुस्थान आणि बांगलादेशच्या सीमेवर सीमा सुरक्षा दल आमि सीमेपलीकडून आलेल्या घुसखोरांमध्ये चकमक उडाली. घुसखोर शस्त्रास्त्रांसह हिंदुस्थानात घुसण्याच्या तयारीत होते. परंतु, सुरक्षा दलांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. या चकमकीत एक जवान जखमी झाला. तर एका घुसखोराला अटकही करण्यात आली. दिनाजपूर जिह्यातील सीमेवरील मलिकपूर गावात 4 आणि 5 जानेवारीच्या रात्री चकमकीची घटना घडली. दरोडा आणि तस्करीमध्ये सहभागी असलेल्या टोळीतील अनेक सदस्य बांगलादेशातून हिंदुस्थानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱया बीएसएफ जवानांना सीमेवर हालचाली दिसल्या. जवान घुसखोरांना भिडले आणि त्यांना सीमेपलीकडे हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी जवानांवर हल्ला केला. बीएसएफनेही प्रत्युत्तर दिले. हल्लोखोरांनी जवानांचे वाहन हिसकावण्याचाही प्रयत्न केला.