परीक्षण – अर्थगर्भ कवितांची वीण

>> वामन देशपांडे

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अभिजात मराठी कवितांच्या भव्य निळ्याभोर आकाशात अगदी अचानकपणे ’केशवसुत’ नावाचा अत्यंत तेजस्वी असा ध्रुवतारा प्रकट झाला आणि अर्वाचीन मराठी कवितेची पहाट अलगदपणे उमलून आली. अगदी नेमकेपणाने सांगायचे झाले तर प्राचीन काव्य विश्वाला 1880-85 च्या दरम्यान या समृद्ध अर्वाचीन कवितेने, विलक्षण प्रतिभाशाली असे सुंदर वळण घेतले. श्रेष्ठ कवी केशवसुतांनी प्रथम ’तुतारी’ फुंकली आणि अर्वाचीन कवितेने अनेक वळणे विविध अंगाने घेत मराठी काव्यविश्व अतिशय समृद्ध केले, हे केवळ सत्य आहे. आता या अर्वाचीन कवितेला सव्वाशे वर्षे उलटून गेली. आजही अनेक कवी आपापला कवितासंग्रह घेऊन या अतुलनीय काव्यविश्वात प्रकट होत आहेत. ही काव्यगंगा तर दुथडी भरून वाहत आहे. कवितेला नवनवे धुमारे फुटत आहेत.

एकविसाव्या या काव्यभारल्या शतकाच्या अगदी सुरुवातीला जे काही महत्त्वाचे कवी काव्यांगणात तेजाने प्रकट झाले, त्यातले एक महत्त्वाचे कविनाम म्हणजे डॉ. ऋता खापर्डे. उच्चविद्याविभूषित डॉ. ऋता खापर्डे या मूलत: कविहृदयाच्या आहेत. त्यांचे जगणे-वागणे आणि मुख्यत: मृदू बोलणे हीच एक कविता आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्या कविता विविध महत्त्वाच्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत आहेत. त्यांचे ’ऋताच्या कविता’, ’मार भरारी’ हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ज्यामुळे त्यांना खरे तर शाश्वत प्रसिद्धी मिळाली. आता त्यांचा तिसरा ’बुकमार्क’ हा काव्यसंग्रह ’एक नवं गाव एक नवी वाट’ आशा थाटात प्रसिद्ध होत आहे. नवनवोन्मेषशाली प्रतिभेचे हे नवे काव्यपुष्प नवे निळे आभाळ घेऊन, आपली सारी काव्यपुण्याई घेऊनच प्रकट झाले आहे.

’तिने विजेची लेखणी केली
तसं सारं निळं आभाळ
वस्तीला आलं काळजात
झरत राहिला पाऊस अविरतपणे…’

हा कवितेतून सतत रिमझिमत राहणारा प्रसन्न पाऊस हेच त्यांच्या एकूण कवितेचे लोभसवाणे रूप आहे. ’वाट बघणं असतं’ या कवितेत तर कवयित्रीने आपल्या एकूणच प्रज्ञाभारल्या कवितेची जणू कुंडलीच मांडली आहे.

‘कुठेतरी वेदना सलत असते
रात्रभर कूस बदलत असते
एकटक आढ्याकडे बघत सते
तेव्हाच कागदावर कविता उमटत असते..’

आपल्या काव्यप्रतिभेच्या नक्षत्रवेळा टिपताना कवितेच्या ओळी किती अलगदपणे बरसतात याचे सुंदर दर्शन कवयित्रीने समर्थपणे प्रस्तुत कवितेतून घडविलेले आहे. कविता म्हणजे काय तर डॉ. ऋता खापर्डे आत्मानुभवाच्या भाषेत प्रकट करताना म्हणतात की,

’खरं तर कविता म्हणजे काय?
शब्दांना घातलेले साज नाही
उधळलेल्या फुलांची बरसात नाही
काळजाचं जिवंत जळणं असतं
गेल्यावरही मागे सरणं असतं..’

हे अगदी सत्य आहे. कवितेचा शेवट करताना कवयित्रीने सर्वच कवींच्या मनातल्या उत्कट भावना अत्यंत काव्यात्म पातळीवर तरलपणे प्रकट केल्या आहेत.

डॉ. ऋता खापर्डे यांच्या कवितांची वीण घट्ट आहे. कल्पनाविलास थक्क करणारा आहे. मानवी वृत्ती-प्रवृत्तींचा वेध घेण्याची विलक्षण ताकद त्यांच्या कवितेत ठायी ठायी दिसते. एखादा उत्कट अनुभव मनात दडलेला असतो. तो अनुभव अचानक एखादी ओळ होऊन कवितेचे रूप प्रकट करू लागतो. कवीच्या अनुभवाची, त्याच्या भोवतीच्या सूक्ष्म अशा निरीक्षणाची मग कविता होते हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याची साक्ष ’बुकमार्क’ या कवितासंग्रहातली कविता निश्चितपणे देते.
डॉ. ऋता खापर्डे यांच्या सर्व कवितांना स्वत:ची लय आहे, ताल आहे, अर्थगर्भ आशय आहे. हेच तर त्यांच्या एकूण कवितांचे खरे सामर्थ्य आहे. एकूणच आशयघन कवितांचा हा मोरपिशी ’बुकमार्क’ काळजाचा ठाव घेणारा ठरेल.

बुकमार्क (काव्यसंग्रह)
कवयित्री – डॉ. ऋता खापर्डे
प्रकाशन – अरजा प्रकाशन
पृष्ठे – 100 मूल्य – 150 रुपये