>> रेशमा गोरे-फुटाणे
नर्मदे हर हर… भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना लोकमाता अर्थात देवता मानतात. हा आदर व्यक्त करण्याच्या नानाविध पद्धती आपल्या संस्कृतीत आहेत. अशापैकी एक वैशिष्टय़पूर्ण आणि एकमेवाद्वितीय परंपरा म्हणजे श्री नर्मदा परिक्रमा. श्रीनर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला उजव्या हाताला ठेवून तिच्या भोवताली घातलेली प्रदक्षिणा. नर्मदा नदीचे प्राचीनत्व, तिचे भौगोलिक स्थान आणि पुण्य प्रदान करण्याचे श्रेष्ठत्व या वैशिष्टय़ांमुळे परिक्रमा ही केवळ नर्मदेचीच केली जाते.
एका भक्तीसत्संग मेळाव्यासाठी श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या खोपोली येथील मूर्तीस्थानी जात असताना परमपूज्य सद्गुरू ब्रह्मलीन श्री वासुदेव वामन बापट गुरुजी यांना जाणवले की, नर्मदेचा नुसताच शाब्दिक जयघोष करण्यापेक्षा नर्मदातीरी श्रीस्वामी महाराजांच्या पालखी व पादुकांसंगे यज्ञसन्मुख सामूहिक मंत्रघोष झाला तर त्यातून नर्मदातीरी शुभलहरी निर्मितीसाठी बरेच काही साध्य होऊ शकते. त्याच वेळी सद्गुरू बापट गुरुजींनी सामूहिक नर्मदा परिक्रमेचा संकल्प केला. या अभूतपूर्व परिक्रमेचा अनुभव त्यात सहभागी झालेल्या साधक भक्तांमार्फतच ‘श्रीनर्मदा परिक्रमा ः एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा’ या ग्रंथात प्रकट केला आहे.
नर्मदा परिक्रमेच्या अनुभवाची शिदोरी मांडताना संपूर्ण प्रवासातील अचूक नोंदी, परिक्रमेचा भौगोलिक तपशील, आरती, नामस्मरण, स्तोत्रपठण, निवडक मंदिरातून घेण्यात येणारे देवी देवतांचे दर्शन, त्याच जोडीला कर्मयुक्त भक्ती मार्गाची सांगड घालण्यासाठी सद्गुरूंनी करून घेतलेले दीपदान, कुमारिका पूजन, विविध मंदिरांतील संस्थापकांचा सद्गुरूंनी केलेला सन्मान यांचे वर्णन स्मृतीरूपाने वाचकांच्या मनात आनंद संवेदनारूपी लहरी निर्माण करतात. त्यायोगे परिक्रमेचे विविध पैलू भविष्यकाळात परिक्रमा करायला उत्सुक असणाऱयांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरू शकतात.
अगदी सुरुवातीला केलेले परिक्रमेचे पूर्वनियोजन असो अथवा शेवटी समविष्ट केलेला परिक्रमेचा संपूर्ण अहवाल असो, या सर्व तपशिलामुळे हा ग्रंथ प्रत्येक नर्मदाप्रेमीने संग्रही ठेवावा इतका सर्वसमावेशक झाला आहे. तसेच श्री टेंबे स्वामींचे नर्मदा किनारी झालेले चातुर्मास, आश्रमांचा तपशील अशी विविध उपयुक्त माहिती समाविष्ट केल्यामुळे ‘श्री नर्मदा परिक्रमा ः एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा’ हा ग्रंथ प्रत्येक वाचकासाठी अलभ्य पर्वणीच आहे.
श्रीनर्मदा परिक्रमा ः एक अभ्यासपूर्ण आनंदयात्रा
विवेचक ः परमपूज्य सद्गुरू श्री वासुदेव वामन बापट गुरुजी
प्रकाशक ः यज्ञेश्वर प्रकाशन
पृष्ठ ः 348, ग्रंथ ः रु. 450