>> अस्मिता प्रदीप येंडे
हिंदू संस्कृतीमध्ये नदीलासुद्धा मातेसमान मानले जाते. म्हणून त्या नदीला आई म्हणून संबोधित केले जाते. नर्मदा परिक्रमा ही एक धार्मिक यात्रा आहे. ही परिक्रमा पायी पूर्ण करण्याला खूप महत्त्व आहे. परिक्रमेतील आत्मिक व दैवीय अनुभूती फक्त पायी परिक्रमेतच मिळू शकतात. नर्मदा परिक्रमा करणाऱया अनेक व्यक्तींनी आपले अनुभव पुस्तकाद्वारे अनेकांपर्यंत पोहोचवले. लेखक अमृतलाल वेगड यांचे ‘तीरे तीरे नर्मदा’, जगन्नाथ कुंटे यांचे ‘नर्मदे हर’ या आणि अशा परिक्रमेशी निगडित अनेक पुस्तके वाचून लेखक सुनील पांडे प्रेरित झाले अन् त्यांनी ‘प्रिय नर्मदा मय्यास’ हे प्रवासवर्णन लिहिले आहे. हे पुस्तक नर्मदा परिक्रमेविषयी माहिती देणारे पुस्तक नाही, तर नर्मदा मय्याशी साधलेला सुसंवाद आहे.
नर्मदा परिक्रमा आणि नर्मदा प्रति प्रदक्षिणा यातील फरक अत्यंत नेमकेपणाने लेखकाने सांगितला आहे. लेखकाने ओंकारेश्वर, महेश्वर आणि अमरकंटकला प्रति नर्मदा प्रदक्षिणा केली. या प्रदक्षिणेवर परतल्यानंतर आपली खुशाली आईला कळवावी, या भावनेने लेखकाने नर्मदा मय्याला पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या संपूर्ण लेखनात आपुलकी, प्रेम, विलक्षण अनुभूती जाणवते. हे पत्र दीर्घ स्वरूपात आहे बरे! हे पत्र म्हणजे लेखकासोबत वाचकांचाही तरल प्रवास आहे.
या प्रवासवर्णनाच्या माध्यमातून नर्मदा मातेची पौराणिक कथा, तिचे उगमस्थान, कायम कुमारी राहण्याचा आशीर्वाद घेऊन सगळ्या परिक्रमावासीयांची आई झालेली नर्मदा माता, भारतवर्षातील प्रमुख नद्यांमध्ये तिचे एक विशिष्ट स्थान आहे. स्कंद पुराणातील रेवाखंडातील तिच्या पंधरा नावांचा उल्लेख, शास्त्रात फक्त तिचीच नर्मदा परिक्रमा सांगितलेली आहे. शास्त्रात नर्मदा नदीला मोक्षदायिनी, जीवनदायिनी, पुण्यदायिनी का म्हटले जाते, याचे उत्तर या पुस्तकात सुंदररीत्या शब्दबद्ध केलेले आहे. ही परिक्रमा माणसाला खूप मोठी शिकवण देऊन जाते. तिची कृपा सदैव जाणवत राहते. या प्रवासात नर्मदा मय्या विविध रूपांतून आपल्या मुलांना भेटत असते.
लेखकाने महेश्वर येथील नर्मदा घाटाविषयी माहिती देताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या साम्राज्याची, सोबतच त्यांच्या कर्तृत्वाची ओळख करून दिली. महेश्वर येथील होळकरांचा वाडा, अहिल्यादेवींचे देवघर, एक आदर्श राज्यकर्ती म्हणून त्यांचे कार्य महनीय आहे. या प्रवासवर्णनाच्या माध्यमातून हा महत्त्वपूर्ण भाग लेखकाने उद्धृत केला आहे. अमरकंटक म्हणजे नर्मदा मय्याची जन्मभूमी. अमरकंटक येथील मंदिरे, दूधधारा धबधबा, कबीर कोठी, श्री यंत्र मंदिर, तेथील निसर्गसौंदर्य याचे वर्णन अगदी सूक्ष्मपणे लेखकाने केले आहे.
ज्यांना वयोमानामुळे किंवा इतर कोणत्या कारणाने परिक्रमा करणे शक्य होत नाही, त्यांनी प्रति नर्मदा प्रदक्षिणा करावी, हे लेखकाला या माध्यमातून सांगायचे आहे. ज्यांना हेही शक्य नाही त्यांनी हे प्रवासवर्णन नक्की वाचावे. तुमच्या मनाला एक वेगळीच आत्मशक्ती प्राप्त होईल. एका विलक्षण अनुभूतीचे साक्षीदार व्हायचे असेल तर जीवनात एकदा नर्मदा परिक्रमा जरूर करावी, हे पुस्तक वाचून वाचकांना प्रेरणा मिळावी हाच या पुस्तकामागील हेतू आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ संतोष धोंगडे यांनी रेखाटले आहे. तसेच डॉ. स्नेहल तावरे यांनी पुस्तकाची पाठराखण केली आहे.
प्रिय नर्मदा मैय्यास– प्रवासवर्णन
लेखक : सुनील पांडे
प्रकाशक : स्नेहवर्धन प्रकाशन
मूल्य : 200 रु.