>> डॉ. सु. भि. वराडे
डॉ. माधवराव चितळे यांनी लिहिलेले आणि साकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘जलतरंग’ हे आत्मपर आठवणी, जलक्षेत्रातील कार्य व अनुभवावर लिहिलेल्या लेखाचे संकलन असलेले महत्त्वाचे पुस्तक होय. हे पुस्तक अतिशय वाचनीय तसेच विचारणीय आहे. डॉ. चितळे हे अनुभवी अभियंते असून विचारवंतही आहेत. जल धोरण, पाणी वापर नियोजन, प्रकल्प योजना, जलविद्युत, क्षेत्रीय समन्वय, आंतरराज्यीय जलवाटप अशा अनेक विषयांत त्यांनी कुशल व पथदर्शक कार्य केले आहे.
आपल्या बालपणी प्रथम जामदा बंधारा व त्याच्या बाजूने खोदलेला चर यामुळे पाणीप्रश्न कसा सोडविला जाऊ शकतो याची जाणीव आपल्याला कशी झाली म्हणजेच थोडक्यात पाण्याशी आपला परिचय कसा झाला याचे वर्णन लेखकाने पुस्तकात केले आहे. तसेच महाविद्यालयामध्ये शिक्षण घेताना सर विश्वेश्वरय्यांनी केलेले काम, नद्यांवरील बंधारे याचे प्रत्यक्ष प्रायोगिक विश्लेषण याची सखोल माहिती, धरण निर्मितीचा इतिहासही आपल्याला वाचायला मिळतो. त्यामुळे पुस्तकाची विचारप्रवणता वाढली आहे. माधवराव चितळे यांनी प्रथम वर्ग अभियंता म्हणून कामाला सुरुवात केली. त्या वेळी ते धरण बांधणीच्या अनेकविध प्रक्रियांमध्ये सक्रिय राहिले. हे कार्य करीत असताना कोयना धरण बांधणीत ते व्यग्र झाले. कोयना प्रकल्पात काम करणे म्हणजे जणू कोयना विद्यापीठात शिकण्यासारखेच होते. त्याचीही माहिती पुस्तकात सविस्तरपणे आली आहे.
लेखकाने जगद्विख्यात प्रिन्स्टन विद्यापीठात 1974-75 या वर्षी वास्तव्य केले. ‘वुड्रो विल्सन’सारख्या महाविद्यालयात त्यांनी एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तेथील अनेक सुविधांविषयी लेखकाने लिहिले आहे. आंतरशास्त्रीय शिक्षणातील तंत्रज्ञान, गणित, संख्याशास्त्र, अर्थशास्त्र यांच्या एकात्मिक अभ्यासाची सुविधा तेथे आहे असाही उल्लेख आहे. सिंचन व्यवस्थापनात वेळोवेळी अनुकूल बदल सुचविले. पुढे लाभक्षेत्र विकासाच्या कार्यप्रणालीत बदल करत त्यातील नियम कसे असावेत याचीही मांडणी केली. जलसंसाधन मंत्रालयाच्या कामाच्या स्वरूपाविषयीही लेखामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. त्यात भूजल निगम, नर्मदा नियमन, नदीजोड इ. जलनीतींची अंमलबजावणी कशी केली व त्यातील अडचणींवर कशा प्रकारे मात केली याचेही लेखकाने वर्णन केले आहे.
शासकीय नोकरीतून निवृत्तीनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय सिंचन व निचरा आयोगाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली. आंतरराष्ट्रीय पाणीप्रश्न कसे असतात, त्यांचे स्वरूप काय असते तसेच प्राप्त परिस्थितीनुसार प्रश्न कसे सोडवले पाहिजेत यासंदर्भात लेखकाचा असलेला अनुभव वाचकांना वेगळी दृष्टी प्रदान करतो. त्या पाच वर्षांत केलेल्या कार्यावर आधारित काम त्यांनी पुढेदेखील सुरू ठेवले. याचदरम्यान जलक्षेत्रातील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा ‘स्टॉकहोम जल पुरस्कार’ चितळेंना जाहीर झाला. तो पुरस्कार स्वीकारताना लेखकाने केलेले अभ्यासू भाषणही आपल्याला प्रस्तुत पुस्तकात वाचायला मिळते.
पाण्यासारख्या जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या अशा अनेक बाबींवर त्यांनी यात भाष्य केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘पाण्याचे नियोजन’ या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि भारतीय मानसिकता कशी आहे याची उकल होत साहजिकच आपण आपल्या दृष्टिकोनाविषयी अधिक जागरूक आहोत का? याचे भान हे पुस्तक वाचताना येते. हे पुस्तक जलक्षेत्रासोबतच अनेक गंभीर विषयांची सुस्पष्ट मांडणी करणारे आहे. वाचकांच्या विचारांना प्रवाहित करण्याबरोबरच नव्या दिशेने नवा ज्ञानकण येऊ शकतो, याची कल्पना आणि चालना हे पुस्तक देऊन जाते. सध्याच्या युगात पाणीप्रश्न अनेक ठिकाणी जटिल झाला आहे. त्याच्या सोडवणुकीचे उत्तर या पुस्तकातून काही प्रमाणात का होईना मिळू शकेल.
जलतरंग
लेखक : माधव चितळे
प्रकाशक : साकेत प्रका