>> वसुंधरा घाणेकर
‘अॅडजस्टमेंट’ हा मेघना साने यांचा तिसरा कथासंग्रह. नावच खूप बोलके आहे. कथांच्या आशयाचा निर्देश करणारे. किंबहुना कथांचा गाभा स्पष्ट करणारे. अॅडजस्टमेंट म्हणजे जुळवून घेणे. अॅडजस्टमेंट म्हणजे तडजोड. तडजोड या कृतीमध्ये कुठेतरी कमीपणाची भावना दडलेली असते. जी व्यक्ती किवा जो गट अशी तयारी दाखवतो, त्याची कुचंबणा असू शकते. मात्र मेघना साने यांच्या कथा वाचताना वेगळा अर्थ उलगडत जातो. कथा वाचताना जाणवते की, तडजोड म्हणजे तह नाही. तडजोड म्हणजे केवळ मनाला मुरड नाही. तडजोड म्हणजे एक जिद्द आहे. परिस्थितीचा समजूतदारपणे स्वीकार करून उभं राहण्याची जिद्द आहे.
बिघडलेलं नातं असो, अपेक्षाभंग असो किवा अचानक उद्भवलेलं संकट असो, तडजोड करत उभं राहणं हे येरागबाळय़ाचे काम नाही. तडजोड करण्याची क्षमता हरवत चाललेल्या आताच्या आधुनिक पिढीला या जिद्दीची जाणीव देण्यासाठी जणू या कथा मेघना साने यांच्या लेखणीतून साकारल्या आहेत. आताच्या काळात अशा तडजोडीची महती सांगण्याची आवश्यकता आहे, ही नेमकी नस लेखिकेला सापडली आहे.
या कथा अलीकडच्या तीनेक वर्षांतल्या आहेत. त्यामुळे चालू काळाशी सुसंगत अशा समस्या प्रामुख्याने डोकावतात. बऱयाच कथा नायिकाप्रधान म्हणता येतील. नायिका मिळवत्या, सुशिक्षित आहेत. शिक्षिका, लेखिका आहेत. सीरियलमध्ये किवा नाटकामध्ये काम करणाऱ्यादेखील आहेत. या क्षेत्राशी संबंधित वातावरण, त्यातील प्रश्न यांची ओळख वाचकाला सहज होते. इथून तिथून मानवी मन आणि त्याचे जटिल असणे, चंचल असणे किती सारखे असते असे वाटल्याशिवाय राहत नाही.
विविध विषयांच्या तीस कथांचा संग्रहात समावेश असून नकळत आपण त्यात गुंतून जातो. अत्यंत कमी आणि नेमक्या शब्दात केलेले चपखल वर्णन आपल्याला खिळवून ठेवते. कथेच्या मांडणीमध्ये लहान वाक्याच्या पेरणीतून व्यक्तिरेखा स्पष्ट उभी राहते. ‘औट घटकेचे राज्य’मध्ये खमंग चिवड्याचा ओळखीचा वास आल्यावर शेखर मनाशी म्हणतो, ‘बायको स्वयंपाकघरात आली म्हणायची.’ करिअरिस्ट बायको असली तरी, स्वयंपाकघरात तिने कौशल्य दाखवावे असे सामान्यत प्रत्येक पुरुषाला वाटत असते. स्त्रीदेखील एखादा पदार्थ आपला ठसा उमटवून बनवत असते. हे सारे या वाक्यात सामावले आहे. ‘बारसे’ या कथेत आशा आपल्या सहकाऱयांचा सल्ला, मदत घेत असते. हे सांगताना लेखिका वर्णन करते, कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आशाकडे एक साधा चॅनेल होता, तो म्हणजे शाळेच्या स्टाफचा!
समस्यांचे वेगवेगळे प्रकार लेखिकेने अभ्यासले आहेत. कधी काळाच्या वेगाशी, भोवतालच्या परिस्थितीशी तर कधी नियतीच्या खेळाशी प्रत्येक नायिकेला सामना करावा लागतो. कथेतील नायिका अशा कठीण प्रसंगी सजग होते. कधी तिचा अपेक्षाभंग होतो, तर कधी स्वतला जोखण्यात ती कमी पडते! पण ती जागी होते. विचार करते. ती व्यक्त होते. सल्लागार शोधते. वाचक तिच्या उभं राहण्याने चकित होतो. आशावादी होतो. स्वतला नकळत प्रेरणा देतो. प्रत्यक्ष जीवनातदेखील हे अनुभवाला येत असतेच ना.
आयुष्यात कित्येकदा मनासारखे दान पडत नाही. आपल्या हातात कित्येकदा काहीच नसते. अशा वेळी आधार, योग्य सल्ला मिळणं गरजेचं असतं. ही गरज मेघना साने यांच्या कथा वाचताना ठळक जाणवते. ‘पर्यवेक्षक’मध्ये नीतिमूल्यांची चिकित्सा आहे. आजच्या रेसच्या युगात मीनलची घालमेल अधोरेखित होते. ‘स्वरकोकीळ’, ‘किंमत’ यासारख्या कथांमध्ये प्रसिद्धीची अनावर हौस, त्याचे मोल हे मुद्दे आपल्यासमोर अनावृत्त होतात. ‘निर्णय’ या कथेत मुलगा आणि सून ‘नो किड‘ असा निर्णय घेतात. त्यात मुलाचे आईवडील खूप दूर म्हणजे मानसिकदृष्टय़ा दूर फेकले जातात. मोडकळीला आलेली कुटुंबचौकट विदारकपणे समोर येते.
असे सगळेच विषय मनाला भिडणारे आहेत. लेखिकेचं मन हे जोडणारं आहे. कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये दुरावा येऊ नये अशी तिची सहृदय भावना उपजत तिच्या मनात वसलेली आहे. तिचा जागोजाग प्रत्यय येत राहतो. कथेत कोणी मित्र किंवा नातेवाईक, हितचिंतक समुपदेशकाची भूमिका पार पडताना दिसतो. ‘मानवी स्वभावातील समजूतदारपणा आणि स्वीकार ही स्वभाववैशिष्टय़े या संग्रहातील कथांचा पाया आहे’ असे नमिता कीर यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. ‘कोष’ या कथेत वीरेंद्र स्वत निराश असूनही आपल्या मैत्रिणीला उदास मनस्थितीतून बाहेर काढतो. ‘सख्ख्य’ ह्या कथेत स्वतचं पोटात ठेवून साठे दांपत्य निराश विवेकला उमेद देते. ‘तुमचे तुम्ही आमचे आम्ही’ या कथेत नायिकेची आई नात्यांचे महत्त्व समजावते.
समस्यांची उकल कथेत अगदी सहजी होते. वास्तवात ती इतक्या सहजी होत नाही. समस्येचे निराकरण होताना त्यातली गुंतागुंत अधिक स्पष्ट व्हायला हवी. विश्लेषण अधिक विस्तृत यायला हवे. अर्थात त्या दीर्घकथा होतील. पण कथाबीज दीर्घकथा होण्याजोगे आहेच. अधिक कसदार होतील. त्यांच्या उपजत सहृदय समुपदेशकाच्या भूमिकेला जास्तीत जास्त न्याय मिळवून देणारे लेखन नक्कीच त्यांच्या हातून घडेल असा विश्वास हा कथासंग्रह देतो.
अॅडजस्टमेंट
लेखक : मेघना साने
प्रकाशक : डिम्पल पब्लिकेशन
पृष्ठसंख्या : 228 n किंमत : रु. 350/-