>> गुरुनाथ तेंडुलकर
अगदी गेल्याच आठवडय़ातली गोष्ट. आमच्या कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधल्या एकाने ठाण्याजवळ, एक टुमदार बंगला विकत घेतला आहे. त्याने आम्हा गृपमधल्या सर्व मित्र-मैत्रिणींना घरी जेवायला बोलावलं होतं. आम्ही मुलं-मुली (हो…शाळा-कॉलेजच्या ग्रुपमध्ये अद्याप मुलं-मुली असाच उल्लेख करतो.) मिळून साधारण 35-40 जण गेलो होतो.
सर्वजण सकाळी साधारण साडेदहाच्या सुमारास त्याच्या घरी जमलो. त्या मित्राने आम्हाला त्याच्या घरच्यांशी ओळख करून दिली. बंगला दाखवला. कॉलनीच्या एअर कंडिशन कॉमन हॉलमध्ये गेट-टुöगेदर ठेवलं होतं. तिथे वेलकम ड्रिंक म्हणून वेगवेगळे प्रेश ज्यूस होते आणि इतरही चार प्रकारचे स्टार्टरस् होते. हॉलमध्ये पार्टी स्पीकर आणि माईकची सोय केली होती. कराओकेचीसुद्धा व्यवस्था केली होती. वय विसरून आम्ही खेळही खेळलो. दुपारच्या सुमारास रुचकर शाकाहारी जेवणाचा बेत होता. जेवणानंतर छान गप्पा मारल्या. कॉलेजच्या दिवसातल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आम्ही सहाच्या सुमारास तिथून निघालो. खरंच सांगतो तो दिवस अगदी सोन्याचा दिवस होता. पण आमच्यापैकी एकजण बसमध्ये बसल्या बसल्या म्हणाला, “बाकी सगळं ठीक झालं, पण जेवणात नॉनव्हेज पाहिजे होतं. रविवारी व्हेज जेवण म्हणजे…’’
“हा यार आणि ड्रिंक ठेवली असती तर जास्तच मजा आली असती.’’ आणखी एकाने री ओढली.
“साला, हा माणूस कॉलेजमध्ये असल्यापासूनच कंजूष. शेअर बाजारात वर्षाला करोडो रुपये कमावतोय पण…’’
गेले सहा-सात तास आम्ही सर्वांनी धमाल मस्ती केली होती. पण त्या आमच्या यजमान मित्राने एवढय़ा जणांचं जे आदरातिथ्य केलं त्याबद्दल कौतुक न करता केवळ ‘अमुक नाही’ आणि ‘तमुक नाही’ असं बोलून हे बोलणारे लोक त्या उपभोगलेल्या क्षणांचा आनंद घेऊ शकत नव्हते. ग्लास अर्धा भरलेला आहे असं म्हणायचं की ग्लास अर्धा रिकामा आहे असं म्हणायचं? जे मिळालं आहे त्याचा आनंद मानायचा की जे मिळालं नाही त्याबद्दल दुःख करायचं? नेमकं काय काय मिळालं की आपण आनंदी होऊ शकतो? आणि हा आनंद नेमका असतो तरी कुठे?
समाधानाने जीवनयात्रा करण्यासाठी नेमकं काय काय लागतं? मला वाटतं की आनंद उपभोगणं ही एक वृत्ती आहे. फारसे पैसे नसलेले लोकदेखील मजेत जगतात आणि गडगंज संपत्ती मिळूनदेखील हव्यास बाळगणारे लोक संपूर्ण आयुष्य कुंथत, कुढत ढकलतात. एक संस्कृत श्लोक सांगतो.
चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नम ।
चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम् ।
अतो अभिलाषो यदि ते सुखस्यात ।
चित्त प्रसादे प्रथमं यतस्व ।।
आपलं चित्त जर प्रसन्न असेल तर संपूर्ण जगामध्ये प्रसन्नता जाणवते. याविरुद्ध जर चित्तच थाऱयावर नसेल तर आजूबाजूचं जग विषण्ण आणि निरर्थक वाटू लागतं. म्हणूनच जर तुम्हाला सुख, समाधान हवं असेल तर आधी चित्त प्रसन्न ठेवायला हवं.
गीतरामायणामधे गुंफलेला रामायणातील एक प्रसंग सांगतो, कैकयीने दशरथाकडे मागितलेल्या वचनानुसार दशरथांनी जड अंतकरणाने श्रीरामाला वनवासात जाण्याची आज्ञा दिली. पित्याच्या आज्ञेनुसार प्रभू रामचंद्र वनवासात जायला निघाले. जाण्यापूर्वी ते निरोप घेण्यासाठी सीतेला भेटले. त्या वेळी सीतेच्या तोंडी गदिमांनी उद्धृत केलेले शब्द किती सुंदर आहेत ते पहा…
सीता म्हणते, निरोप कसला माझा घेता,
जेथे राघव तेथे सीता
ती पुढे म्हणते, संगे असता नाथा, आपण
प्रासादाहुन प्रसन्न कानन
शिळेस म्हणतील जन सिंहासन
रघुकुलशेखर वरी बैसता, जेथे राघव तेथे सीता.
म्हणूनच मनाची प्रसन्नता सर्वात महत्त्वाची. बाकी इतर बाह्य गोष्टी नसल्या म्हणून काहीही अडत नाही. हेच सांगणारी आजच्या कवितेचं शीर्षक आहे यात्रा आणि कविवर्य आहेत तात्यासाहेब म्हणजेच वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज.
यात्रा
आकाशातील खाविंदांचा, हुकूम नव्हता अपुल्या हाती
मातीमधल्या अधिकारांचा, मांडव नव्हता माथ्यावरती
महीरपी कंसात एक या, गणितावाचुन शिरलो आपण
स्वरावाचुनि गीत बांधले, शरिरावाचुनि रतलो आपण
पुनवेवाचुन चंद्र भोगला, यज्ञावाचुन जळलो आपण
याच्यावाचुन त्याच्यावाचुन, घडले आहे सारे काही
आणि तरीहि, चारधाम ही यात्रा अपुली
कशाहिवाचुन, आणि कुठेही अडली नाही,
कवी ः कुसुमाग्रज
कवितासंग्रह ः काव्यवाहिनी
कॉन्टिनेंटल प्रकाशन