
परवानगी शिवाय डिमॅट अकाऊंट मधून 75 लाखांचे शेअर ट्रान्स्फर प्रकरणी कारवाईत दिरंगाई करणाऱया पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पोलीस ताळ्यावर आले आहेत. फसवणूक प्रकरणी कफ परेड पोलिसांनी बँक व संबंधित अधिकाऱयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने आज उच्च न्यायालयात देण्यात आली.
मुलुंड येथील याचिकाकर्ती ही एनआरआय असून विप्रो लिमिटेड कंपनीत ती सिस्टम मॅनेजर होती. निवृत्तीनंतर कंपनीने तिला शेअर दिले होते. त्यासाठी आयडीबीआय बँकेत डिमॅट अकाऊंट उघडण्यात आले. 2019 साली तिच्या डिमॅट खात्यातून 75 लाख रुपये किमतीचे 31 हजार 690 शेअर तिच्या परवानगी शिवाय ट्रान्स्फर करण्यात आले.
या फसवणूक प्रकरणी महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पोलिसांच्या वतीने खंडपीठाला सांगण्यात आले की, आयडीबीआय कॅपिटल मार्पेट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड व संबंधित अधिकाऱयाविरोधात 14 एप्रिल रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 465, 467, 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच हा एफआयआर मुंबईच्या सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. न्यायालयाने याची दखल घेत पोलिसांना तपासाचा प्रगती अहवाल व रक्कम परत करण्याबाबत बँकेला उत्तर सादर करण्याचे निर्देश देत, सुनावणी 29 एप्रिल रोजी ठेवली.