बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने लुधियाना येथून पकडलेल्या सुजित सिंग याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या अन्य नऊ आरोपींनाही न्यायालयात हजर केले होते. त्यातील धर्मराज कश्यप, गुरनेल सिंग आणि प्रवीण लोणकर यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली, तर हरीश निशाद याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच उर्वरित आरोपींच्या पोलीस कोठडीत 4 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.
सुजित हा कारागृहात असलेला लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई तसेच झिशान अख्तर आणि शुभम लोणकर यांच्या संपर्कात होता. समाजमाध्यमांवर विविध खात्यांच्या माध्यमातून तो आरोपींच्या संपर्कात होता, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. दरम्यान, गुन्हे शाखेने सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पाचवे पिस्तूल पुण्यातून हस्तगत केले. देशी बनावटीचे पिस्तूल असल्याचे समजते.