लाचखोर न्यायाधीशाला दणका, हायकोर्टाने नाकारला अटकपूर्व जामीन

लाचखोरीचा आरोप असलेल्या सातारा येथील सत्र न्यायाधीशाला उच्च न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन नाकारला. धनंजय निकम असे या सत्र न्यायाधीशाचे नाव आहे. निकम यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा आरोप आहे. हा आरोप खोटा आहे. माझा याच्याशी काहीही संबंध नाही, असा दावा करत निकम यांनी अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली. न्या. एन.आर. बोरकर यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सोमवारी हा निकाल जाहीर केला.

काय आहे प्रकरण

आरोपी किशोर संभाजी खरात व आनंद मोहन खरात यांच्यामार्फत सत्र न्यायाधीश निकम यांनी लाच मागितल्याचा एसीबीचा आरोप आहे. फसवणुकीच्या आरोपा अंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीच्या नातलगाकडे खरात बंधू गेले होते. आम्ही जामीन मिळवून देऊ, असे त्यांनी सांगितले. याची तक्रार एसीबीकडे केली. त्यानुसार एसीबीने निकम यांच्यासह अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता.