निकालाच्या दिवशी सुनावणी तहकूबची मागणी करणाऱ्या वकिलाची चौकशी करा, हायकोर्टाचे बार कौन्सिलला आदेश

एका प्रकरणावर युक्तिवाद पूर्ण होऊनही निकालाच्या दिवशी सुनावणी तहकूब करण्याची मागणी करणाऱ्या वकिलाची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला दिले आहेत. सुनावणी तहकूबच्या मागणीतून वकिलाने खटल्याला विलंब केल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

मुंबईतील जोगेश्वरी येथील 990 चौरस फूट व्यावसायिक मालमत्तेच्या वादातून हा खटला सुरू झाला आहे, जिथे भाडेकरूने घरमालकाच्या संमतीशिवाय ती जागा तिसऱया पक्षाला देण्यात आली. 1996 मध्ये दाखल झालेल्या या दाव्यामुळे 2016 मध्ये बेदखलीचा आदेश देण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी सर्व पक्षकारांनी युक्तिवाद पूर्ण केला. त्यामुळे न्यायालयाने निकाल राखून ठेवला, मात्र याचिकाकर्त्यांचे वकील विजय पुरले यांनी निकालाच्या दिवशी या प्रकरणावर आणखी युक्तिवाद करण्यासाठी सुनावणी तहकूब करण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत वकिलाला फटकारले. अॅड. विजय कुरले यांचे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य व प्रथमदर्शनी गैर असून अशा वर्तनामुळे न्यायालयातील वकिलाच्या कर्तव्यांचे उल्लंघन होत असल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले. त्यानंतर न्यायालयाने महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलला अॅड. विजय कुरले यांची याप्रकरणी औपचारिक चौकशी करण्याचे आदेश दिले.