‘बर्गर किंग’ नावावर हक्क कुणाचा? यावरून पुण्यातील रेस्टॉरंट व अमेरिकेतील ‘बर्गर किंग’ कंपनीमध्ये सुरू असलेला वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. पुण्यातील रेस्टॉरंटने ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत अमेरिकेतील कंपनीने अपील दाखल केले आहे. या अपिलाचा अंतिम फैसला होईपर्यंत ‘बर्गर किंग’ नाव वापरू नका, असे अंतरिम आदेश न्यायालयाने पुण्यातील रेस्टॉरंटला दिले.
अमेरिकेतील बर्गर किंग कॉर्पोरेशनने दाखल केलेल्या अपिलावर न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. दोन्ही पक्षकारांनी अपिलाचा निपटारा करेपर्यंत दहा वर्षांतील व्यवहाराचा रेकॉर्ड तसेच करासंबंधी कागदपत्रे सादर करण्याची तयारी करावी, असे आदेश खंडपीठाने दिले. पुण्यातील रेस्टॉरंटने ‘बर्गर किंग’च्या ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याचे प्रकरण पहिल्यांदा 2011 मध्ये न्यायालयात पोहोचले होते. रेस्टॉरंटने ‘बर्गर किंग’ नावाचा वापर केला होता. याविरोधात अमेरिकेतील कंपनीने पुणे न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, तिथे याचिका फेटाळल्याने कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.