बहुचर्चित पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी सादर झालेल्या क्लोजर रिपोर्टचा तपशील सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत. या आत्महत्येमागे मिंधे गटाचे आमदार संजय राठोड असल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे आमदार राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या गुह्याचा क्लोजर रिपोर्ट पोलिसांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सादर केल्याची माहिती महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला दिली.
पोलिसांनी कोणत्या पुराव्यांच्या आधारे हा क्लोजर रिपोर्ट महानगर दंडाधिकारी न्यायालयात सादर केला हे आम्हाला तपासायचे आहे. त्यामुळे पोलिसांनी पुराव्यांचा सविस्तर तपशील असलेले प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी 16 डिसेंबर 2024 पर्यंत तहकूब केली.
काय आहे प्रकरण…
बीडच्या पूजा चव्हाणने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी घेत आत्महत्या केली. या आत्महत्येसाठी आमदार राठोड जबाबदार असल्याचा आरोप झाला. त्यानंतर आमदार राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पारदर्शक तपासासाठी थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.