‘Burger King’साठीची लढाई सुरूच; पुण्यातील रेस्टॉरंटला हे नाव वापरण्यास घातली बंदी, वाचा काय आहे प्रकरण

मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील एका रेस्टॉरंटला बर्गर किंग हे नाव वापरण्यास बंदी घातली आहे. अमेरिकेतील नामांकित कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनच्या ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी अतंरिम आदेश जारी करण्यात आला. यानुसार पुण्यातील रेस्टॉरंटला अंतिम सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागेपर्यंत ‘बर्गर किंग’ हे नाव वापरण्यास बंदी घातली आहे.

न्यायमूर्ती ए.एस.चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने अंतरिम अर्जावर निर्णय दिला. बर्गर किंग हे नाव वापरल्या प्रकरणी बर्गर किंग कॉर्पोरेशन या अमेरिकेतील नामांकित कंपनीने पुण्यामधील रेस्टॉरंटचे मालक अनहिता इराणी आणि शापूर इराणी यांच्या विरोधात पुणे न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुणे न्यायालयाने याप्रकरणी पुणे स्थित रेस्टॉरंटच्या बाजूने निकाल देत ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती. पुणे न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका ऑगस्ट महिन्यात बर्गर किंग कॉर्पोरेशनने उच्च न्यायालयात दाखल केली. उच्च न्यायालयात सोमावारी (12 डिसेंबर 2024) याप्रकरणी सुनावणी पार पडली. त्यानुसार आता पुणे स्थित रेस्टॉरंटला अंतिम सुनावणी पार पडून निकाल लागेपर्यंत बर्गर किंग हे नाव वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

बर्गर किंग कॉर्पोरेशन कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन सर्व पुराव्यांचा विचार करण्यात येईल. तोपर्यंत अंतरिम आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.