Pune Porsche Accident Case : अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर, हायकोर्टाचे आदेश

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवत दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आरोपी सध्या बालसुधारगृहात असून तिथून त्याची तात्काळ सुटका करा, असा आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. हायकोर्टाच्या या आदेशामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सुटका झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीला आत्याच्या ताब्यात देण्याचेही हायकोर्टाने नमूद केले आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात कल्याणीनगरमध्ये 19 मे रोजी रात्री अल्पवयीन आरोपीने विनानंबरच्या पोर्श कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला धडक दिली. या धडकेत तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पुण्यासह महाराष्ट्रात या अपघाताबाबत संतापाची लाट उसळली. समाजातील विविध स्तरातून चौफेर टीका झाल्यानंतर अखेर पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला. प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी दहा स्थापन करण्यात आली. यानंतर सर्वप्रथम मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला अटक करण्यात आली.

पोलीस तपासात अनेक वादग्रस्त गोष्टी उघडकीस आल्या. पुराव्यांची छेडछाड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. आज या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने निकाल दिला. ज्यात अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर करत त्याची बालसुधारगृहातून सुटका करण्याचे आदेश दिले.