
पाच वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या 28 वर्षांच्या महिलेला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. जन्मदात्री महिला आपल्या पोटच्या मुलाच्या बाबतीत असे वागूच शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. याप्रकरणात आरोप केला आहे की मुलगा एक वर्षाचा असताना मातेने त्याला मारझोड केली. पण माता अशाप्रकारे मुलाला मारहाण करू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. याचवेळी पोलिसांनी केलेली अटकेची कारवाई चुकीची असल्याचे नमूद करीत न्यायालयाने आरोपी मातेला जामिनावर सोडून देण्याचे आदेश दिले.
चिमुरड्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे भक्कम वैद्यकीय पुरावे नाहीत. त्याचबरोबर कथित गुन्ह्याच्या तपासात अनेक त्रुटी आहेत, असे न्यायालयाने निर्णय देताना म्हटले. आरोपी महिलेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि मुंबईत अटक केली होती.
महिलेने तिच्या लिव्ह- इन पार्टनरच्या सहाय्याने मुलाचा छळ केला. त्यात मुलाला अनेक प्रकारे दुखापत झाल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने न्यायालयात केला. मात्र त्याचे सबळ वैद्यकीय पुरावे न्यायालयात सादर केले नाहीत. त्यावरून तपासाबाबत शंका उपस्थित होत असल्याची टिप्पणी करीत न्यायालयाने आरोपी मातेला जामीन मंजूर केला. आरोपी महिलेने मुलाला वैद्यकीय उपचारासाठी विविध रुग्णालयांत नेले होते, याकडे महिलेच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्याची नोंद घेत न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी महिलेला जामीन मंजूर करण्याचा निर्णय दिला.