शिक्षणाचा हक्क हा आनंदी जगण्याचा मंत्र, हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

शिक्षण हक्क हा आनंदी जगण्याचा मंत्र आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने अपघातामुळे प्रवेश हुकलेल्या विद्यार्थीनीला दिलासा दिला. लाम्या सिद्दिकी या विद्यार्थीनीला मास्टर ऑफ सायन्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे. ती छत्तीसगडची आहे. मुंबईतील सेंटर ऑफ एक्सीलंस इन बेसिक सायन्समध्ये तिचा प्रवेश होणार होता. अपघातामुळे ती प्रवेश प्रक्रियेसाठी पोहोचू शकली नाही. तिला प्रवेश नाकारण्यात आला. न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठाने लाम्याला प्रवेश देण्याचे आदेश दिले.

लाम्याची मागणी

मला दहावीला 96 तर बारावीला 90 टक्के गुण मिळाले आहेत. एनईएसटीच्या परीक्षेत 491 गुण मिळाले आहेत. अपघातामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी पोहोचता आले नाही, ही बाब लक्षात घेऊन अन्य कोणत्याही प्रवेश देण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत. गुणवत्तेच्याआधारे प्रवेशासाठी निवड करावी, अशी मागणी लाम्याच्यावतीने करण्यात आली.

शिक्षण संस्थेचा युक्तिवाद

जम्मू-काश्मिर व लडाखमध्ये तेथील विद्यार्थ्यांसाठी जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. या जागा युजीसीच्या आदेशाने तयार करण्यात आल्या आहेत. युजीसीचे म्हणणे ऐकून लाम्याला तेथे प्रवेश दिला जाऊ शकतो, असे मुंबईतील शिक्षण संस्थेच्यावतीने अ‍ॅड. सौरभ पाकळे यांनी न्यायालयाला सांगितले.

काय आहे प्रकरण

लाम्या या वर्षी बारावी उत्तीर्ण झाली. मास्टर ऑफ सायन्सच्या प्रवेशासाठी तिने एनईएसटीची परीक्षा दिली. भुवनेश्वर व मुंबईतील शिक्षण संस्थेसाठी तिची नोंदणी झाली. मुंबईतील शिक्षण संस्थेत तिचे वेटिंग लिस्टमध्ये नाव होते. नंतर तिला अ‍ॅडमिशन कौन्सिलिंगसाठी बोलवण्यात आले. अपघात झाल्यामुळे ती कौन्सिंलगला पोहोचू शकली नाही. कौन्सिंलगसाठी अन्य तारीख देण्याची विनंती तिने केली. ऑफलाईन प्रवेशासाठी न येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जात नाही, असे तिला सांगण्यात आले. त्याविरोधात लाम्याने ही याचिका केली होती.