
वाराणसीहून बंगळुरूला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्बची अफवा केल्याप्रकरणी एका कॅनडाच्या नागरिकाला अटक केली आहे. योहानथन निशिकांत असे अटक आरोपीचे नाव आहे. योहानथन निशिकांतला विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी फुलपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
शनिवारी रात्री 10 वाजून 24 मिनिटांनी इंडिगो एअरलाइन्सचे विमान वाराणसीहून बंगळुरुला उड्डान करणार होते. विमान नियोजित वेळेपेक्षा थोडे उशिरा उड्डान करणार होते. दरम्यान, जोनाथन हा आपली जागा सोडून दुसरीकडे समोर जाऊन बसला. क्रू मेंबरने त्याला त्याच्या सीटवर जाऊन बसण्यास सांगितल्यानंतर तो चिडला आणि त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचे ओरडला.
यानंतर त्याने ‘अल्लाह हू अकबर’, ‘जय श्री राम’ आणि ‘हर हर महादेव’ च्या मोठ्याने घोषणा देण्यास सुरुवात केली. प्रवाशाच्या या कृत्यानंतर विमानात घबराटीचे वातावरण पसरले. एअर ट्रॅफिक कंट्रोलला या प्रकरणाची माहिती देण्यात आली. विमान परत एप्रनवर आणून तात्काळ रिकामे करण्यात आले. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानासह संपूर्ण विमानतळावर शोध मोहीम राबवली.
तीन तास तपास मोहिम राबवल्यानंतर ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर जोनाथनविरोधात फुलपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे विमान बंगळुरूला रवाना करण्यात आलं.