सलमान खानने बुलेटप्रूफ काचेतून चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा

निमित्त ईदचे होते, पण आपल्या आवडत्या भाईजानची एक झलक पाहण्यासाठी वांद्रे गेलेक्सी अपार्टमेंटबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी जमली होती. जसजशी संध्याकाळ सरत चालली होती, तसतसे अधिकाधिक चाहते सलमानच्या घराबाहेर जमू लागले. पठाणी लूकमध्ये तो येताच एकच जल्लोष झाला ईद मुबारकचा… तो आला तो भाच्यासोबत आणि लाडक्या भाचीसोबत.

देशभरात सोमवारी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. यावेळी आपल्या आवडत्या अभिनेत्याला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमानच्या चाहत्यांनी वांद्रे येथील त्याचे निवासस्थान गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये एकच गर्दी केली होती. घराच्या बाल्कनीतील बुलेटप्रूफ काचेतून सलमानने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. भाईजानला पाहताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेना. चाहत्यांनीही हात उंचावत आपल्या लाडक्या भाईजानला ईदच्या शुभेच्छा दिल्या.

लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर घराच्या बाल्कनीला बुलेटप्रूफ काचा लावण्यात आल्या आहेत. याच बुलेटप्रूफ काचेतून हात दाखवत सलमानने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सलमानने पांढरा पठाणी कुर्ता आणि सलवार घातला होता. सलमानसोबत त्याची भाची आयत आणि भाचा आहिल देखील शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.