4 फेब्रुवारी हा जागतिक कॅन्सर दिवस म्हणून ओळखला जातो. कॅन्सर या आजाराचे नाव ऐकताच माणूस अर्धा अधिक खचतो. कर्करोग हा आजार केवळ शरीराची नाही तर आपल्या मनाचीही परीक्षा घेतो. यातून तरण्यासाठी दिव्य इच्छाशक्ती हाच एकमेव पर्याय आहे. जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने आपण असे सेलिब्रिटी पाहुया जे कणखरपणे कॅन्सरला सामोरे गेले होते आणि आजही जात आहेत.
हिना खान
टेलिव्हिजन जगतातील ख्यातनाम अभिनेत्री म्हणून हिनाची ओळख आहे. हिना खान सध्याच्या घडीला कर्करोगाशी झगडत आहे. यावर बोलताना तिने कुठेही मौन बाळगलं नाही. हिना म्हणते, कर्करोग हा शेवट नाही तर तो तुमच्याच आयुष्याचा एक भाग आहे. उपचार घेत असताना हिनाने कायम पाॅझिटिव्ह गोष्टी तिच्या प्रेक्षकांसमोर ठेवत स्वतःचा आदर्श निर्माण केला आहे.
मनीषा कोइराला
बॉलीवूड अभिनेत्री मनीषा कोइरालाला २०१२ मध्ये स्टेज IV गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. या निदानाने तिला सुरुवातीलाच धक्का दिला. “सायलेंट किलर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिम्बग्रंथि कर्करोगात, पोटफुगी, पोटदुखी आणि वारंवार लघवी होणे अशी लक्षणे होती. मनीषाने अमेरिकेत उपचार घेतले आणि ती आता यातून बरी सुद्धा झाली आहे. मनीषाने तिच्या “हील्ड: हाऊ कॅन्सर गेव्ह मी अ न्यू लाईफ” या पुस्तकामध्ये कर्करोगाने तिच्या आयुष्यात कसे बदल घडवून आणले यावर लिहिलं आहे.
सोनाली बेंद्रे
अभिनेत्री सोनाली बेंद्रेला स्टेज ४ मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले होते. जागतिक कर्करोग दिनानिमित्त सोनाली म्हणते, “तुमचा प्रवास कठीण असणार आहे, पण आशेने त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करा, एक दिवस तुम्ही या रोगावर नक्की मात कराल. तिने कॅन्सरच्या तिच्या उपचार घेत असलेल्या अनेक घडामोडी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. कर्करोगाच्या रुग्णांना उपचार घेण्यासाठी ती सतत प्रेरित करत असते.
संजय दत्त
ऑगस्ट २०२० मध्ये, जेव्हा जग कोविड-१९ साथीच्या आजाराशी झुंजत होते, तेव्हा संजय दत्त यांना स्टेज ४ फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. दुबईमध्ये केमोथेरपी घेत संजय दत्तने कठीण दिवसांना कणखरपणे तोंड दिले.
युवराज सिंग
भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणजे युवराज सिंग, जो भारताचा निवृत्त क्रिकेटपटू आहे. २०११ मध्ये, त्याला मेडियास्टिनल सेमिनोमा, फुफ्फुसांमधील छातीतील ऊतींना प्रभावित करणारा एक दुर्मिळ फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे आढळून आले. त्याने अमेरिकेत केमोथेरपी उपचार घेतले आणि मार्च २०१२ मध्ये भारतात परतला. त्याने त्याच्या कर्करोगाचा सकारात्मक सामना केला आणि २०१२ च्या टी२० विश्वचषकात भाग घेऊन यशस्वी पुनरागमन केले.
किरण खेर
ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी किरण खेर यांना २०२१ मध्ये मल्टिपल मायलोमा, एक प्रकारचा रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. किरण खेर यांनी या रोगाशी सामना तर केलाच, परंतु याबाबत जनजागृती करण्यातही त्या कधीच मागे हटल्या नाहीत.
अनुराग बसू
२००४ मध्ये, दिग्दर्शक अनुराग बसू यांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. त्यावेळी त्यांना फक्त दोन आठवडे जगण्याची मुदत देण्यात आली होती. तरीही या आजारावर मात करत त्यांची या आजारातून सुटका झाली. त्यांची गोष्ट ही सर्वांसाठी प्रेरणादायी नक्कीच आहे.
ताहिरा कश्यप
चित्रपट दिग्दर्शिका ताहिरा कश्यप यांना २०१८ मध्ये स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. ताहिरा कश्यप यांनी कॅन्सर उपचाराबद्दलचा अनुभव सर्वांसोबत शेअर केलेला आहे.