बॉलीवूडची ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया 19 व्या शतकातील प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहेत. डिंपल यांनी अगदी लहान वयातच प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या आठ वर्षांनंतर हे जोडपे वेगळे झाले असले तरी, या जोडप्याने कधीही अधिकृतपणे घटस्फोट घेतला नाही. डिंपल यांनी एका मुलाखतीत राजेश खन्ना यांच्याशी लग्न करून कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला होता, हे सांगितले.
डिंपल कपाडिया यांनी फिक्की एफएलओ जयपूर चैप्टरला मुलाखत दिली. या अभिनेत्रीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी माहिती दिली. माझं राजेश सोबत लग्न झालं तेव्हा मी लहान होते. मला माझं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं वाटायचं. मला अशी आशा होती की राजेश माझ्यासाठी ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू’ हे गाणं म्हणेल. पण हे माझं स्वप्न स्वप्नचं राहिलं. मला सगळे चित्रपट खरे वाटायचे. त्यामुळे जसं चित्रपटांमध्ये होतं ते खऱ्या आयुष्यातही व्हावं असं मला वाटायचं. मात्र राजेशने माझ्यासाठी असं कधीच केलं नाही. तेव्हा माझ्या स्वप्नाचा अक्षरश: चुरा झाला होता, असे डिंपल म्हणाल्या.
दरम्यान डिंपल यांनी त्यांच्या सगळ्यात आवडत्या रोल बद्दलही काही गोष्टी आवर्जुन सांगितल्या. माझ्या मी अनुभवलेली आयुष्यातील सगळ्यात अप्रतिम भूमिका म्हणजे मिसेस राजेश खन्ना ही आहे. आम्ही जेव्हा प्रेमात पडलो तेव्हा मी 13 वर्षांची होते आणि राजेश माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे होते. एकदा आम्हा दोघांनाही अहमदाबादला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी राजेश आणि मी एकाच विमानात होतो. त्यावेळी ते माझ्या बाजूला बसले होते. त्याच क्षणी मला ते आवडले होते. तेव्हा मी त्यांना म्हणाले, तिथे खूप गर्दी असेल, तुम्ही माझा हात पकडाल ना? तेव्हा त्यांनी मला अगदी सहज उत्तर दिल हो, नक्की का नाही! पुढे मी म्हणाले फक्त आतापूरता नाही आयुष्यभरासाठी… बस आणि रेस्ट इज हिस्ट्री… असे त्या म्हणाल्या.