
बोगस रेरा नोंदणी क्रमांक घेऊन कल्याण- डोंबिवलीत उभारलेल्या 65 इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच आता बनावट सातबारा उतारा तयार करून भूमिपुत्राची जमीन बळकावल्याचे प्रकरण समोर आले आहे. भूमाफिया आणि एका बिल्डरने या जमिनीवर चार टॉवर उभारून अटाळीतील भगत कुटुंबाला देशोधडीला लावले आहे. केडीएमसीचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने अशोक भगत यांनी कुटुंबीयांसह पालिका मुख्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.
अशोक भगत यांची अटाळी येथे सर्व्हे नंबर 23 हिस्सा नंबर 4 येथे पिढीजात 25 गुंठे जमीन आहे. अधिकृत सातबाराही त्यांच्या नावावर आहे. मात्र 2012 विराट कन्स्ट्रक्शनचे बिल्डर परेश पारीख, आकाश पारीख, शिल्पा पारीख, प्रितेश पटेल, स्नेहा पटेल, पियुष पटेल यांनी आपल्या जमिनीवर बेकायदा कब्जा केल्याचा आरोप अशोक भगत यांनी केला आहे. वास्तुविशारद सतीश कानडे, पोलीस पाटील चंद्रकांत भगत आणि दलाल संदीप मुंढे यांनी राजकीय वरदहस्त आणि थेट पालिका अधिकारी व तलाठ्याला हाताशी धरून बोगस नोंदी घालून सातबारा तयार केला. त्यानंतर बिल्डरांनी या ठिकाणी विराट रेसिडेन्सी नावाने सात मजली चार इमारतींचे बांधकाम केले. घर खरेदीदारांची फसवणूक करून सदनिका विकल्या आहेत. बेकायदा इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी अशोक भगत यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली आहे.
आकाचा काका कोण?
विराट कन्स्ट्रक्शनने भूमिपुत्र अशोक भगत यांची जमीन बळकावून अनधिकृत सात मजली चार इमारती उभारल्या. बनावट कागदपत्रांच्या आधारे 126 सदनिका आणि 30 दुकाने विकून बिल्डरने कोट्यवधींची माया जमवली आहे. यातून घरे खरेदी करणाऱ्या गरजूंचीही फसवणूक केली आहे. 2019 मध्ये उच्च न्यायालयाने सातबारा उताऱ्यामध्ये छेडछाड झाल्याचे निरीक्षण नोंदवताना या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन चार आठवड्यांत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र पालिका आणि महसूल विभागाने बेकायदा बांधकाम करणाऱ्या आकावर काहीच कारवाई केली नाही.