बोगस कर्जमाफी प्रकरण : मंत्री राधाकृष्ण विखेंसह 54 जणांवर गुन्हा दाखल

पद्मश्री विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तब्बल नऊ कोटी बोगस कर्जमाफीप्रकरणी भाजप नेते आणि राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांविरुद्ध येथील लोणी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्याचे तत्कालीन साखर आयुक्त यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचासुद्धा यामध्ये समावेश आहे. या प्रकरणाची फिर्याद बाळासाहेब केरूनाथ विखे यांनी दिली आहे.

विखे कारखान्याने केलेल्या फसवणुकीच्या संदर्भामध्ये बाळासाहेब केरूनाथ विखे, दादासाहेब पवार, अरुण कडू, एकनाथ घोगरे, ऍड. सुरेश लगड यांनी न्यायालयात पाठपुरावा केला होता. मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.