
अमेरिकेची विमान उत्पादक कंपनी ‘बोइंग’ने बंगळुरू येथील आपल्या अभियांत्रिकी तंत्रज्ञान पेंद्रातील 180 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. जागतिक स्तरावर नोकर कपात करण्याचा निर्णय बोइंगच्या व्यवस्थापनाने घेतलेला आहे. त्याचाच भाग म्हणून हिंदुस्थानातील कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
जागतिक स्तरावर अनेक आव्हानांचा सामना करत असलेल्या बोइंगचे हिंदुस्थानात सुमारे 7 हजार कर्मचारी आहेत. कंपनीसाठी हिंदुस्थान ही मोठी बाजारपेठ आहे. कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, बोइंग दरवर्षी 300 पेक्षा जास्त सप्लायर्सच्या नेटवर्कमधून सुमारे 1.25 अब्ज डॉलरची खरेदी करते.
गेल्या वर्षी बोइंगने 10 टक्के कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. असे समजतेय की, बोइंगने डिसेंबर 2024 च्या तिमाहीत बंगळुरूमधील बोइंग इंडिया इंजिनीअर टेक्नोलॉजी सेंटरमधील 180 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. अद्याप कंपनीकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.
कंपनीच्या सेवेवर परिणाम होणार नाही
बोइंग कंपनीच्या या टाळेबंदीचा त्यांच्या ग्राहकांसह आणि सरकारच्या कामकाजावर परिणाम होणार नसल्याचे सांगितले. यासाठी कंपनीने धोरणात्मक कर्मचारी कपात केली आहे. ज्यामुळे मर्यादित संख्येच्या पदांवर परिणाम झाला आहे. बंगळुरू व चेन्नई येथील बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्रात जटिल आधुनिक एरोस्पेस काम केले जाते. बंगळुरूमधील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान परिसर हा कंपनीच्या अमेरिकेबाहेरील सर्वात मोठय़ा गुंतवणुकीपैकी एक आहे.