बॉडी स्प्रेची बॉटल गॅस शेगडीजवळ ठेवल्याने कर्जतमध्ये भयंकर स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा धमाका इतका भयंकर होता की घटनेनंतर छताच्या पत्र्यांना भगदाड पडले असून घराच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. बाजूच्या काही घरांचेदेखील नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील एका सदस्याने प्रसंगावधान राखत गॅस सिलिंडरचे रेग्युलेटर वेळीच बंद केल्याने जीवितहानी टळली. एका बॉडी स्प्रेमुळे एवढा मोठा धमाका झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कर्जत शहरातील पाटील आळी परिसरातील बौद्धनगरमध्ये माजी नगरसेवक राहुल डाळींबकर यांचे जुने घर आहे. या घरात त्यांची भाची आणि तिचा मुलगा राहतो. सोमवारी सायंकाळी डाळींबकर यांच्या भाच्याच्या हातातून अगरबत्ती खाली पडल्याने त्याने दुसऱ्या हातातील बॉडी स्प्रे गॅस शेगडीजवळ ठेवला. अगरबत्ती उचलून तो घराबाहेर गेला. त्यानंतर काही सेकंदातच बॉडी स्प्रेला आग लागत मोठा स्फोट झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हा स्फोट इतका भयंकर होता की स्फोटानंतर डाळींबकर व आजूबाजूच्या दोन ते तीन घरांच्या भिंतींना तडे गेले. खिडक्यांच्या काचा फुटल्या तसेच डाळींबकर यांच्या घराच्या पत्र्यांना भगदाड पडले. स्फोटाच्या आवाजाने घाबरलेल्या रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली.
तर सावधानता बाळगा !
स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता की अनेकांना वाटले सिलिंडरचा स्फोट झाला. मात्र बॉडी स्प्रेमुळे हा धमाका झाल्याची माहिती मिळाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे बॉडी स्प्रे, परफ्युम वापरणाऱ्या नागरिकांनी अशा वस्तू ज्वलनशील वस्तूंपासून लांब ठेवून सावधानता बाळगावी हेच या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, स्फोट झाला त्यावेळी शेगडी सुरू असल्याने डाळींबकर यांनी खबरदारी घेत तत्काळ सिलिंडरचा रेग्युलेटर बंद केला, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.