
पनवेल-पुणे रेल्वे ट्रॅकवर कर्जतमध्ये महिलेची सुटकेस बॉडी सापडल्याने खळबळ उडाली आहे. हत्या करून हा मृतदेह बॅगमध्ये कोंबण्यात आला असून धावत्या ट्रेनमधून ही बॅग फेकली असावी असा प्राथामिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, शीना बोरा हत्याकांड, पेणमध्ये महिनाभरापूर्वी सुटकेसमध्ये सापडलेला तरुणीचा मृतदेह आणि आता कर्जतच्या रेल्वे ट्रॅकवर महिलेची सुटकेस बॉडी सापडल्याने रायगड जिल्ह्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल केला जात आहे.
मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे मार्गिकेवरील टीकेडब्ल्यू किमी क्रमांक 112/5 जवळ कर्जतच्या ठाकूरवाडी परिसरात सकाळी सवाअकराच्या सुमारास येथील नागरिकांना गुलाबी रंगाची सुटकेस आढळून आली होती. या सुटकेसमधून हात बाहेर लटकत असल्याचे दिसताच ही घटना रेल्वे पोलीस आणि कर्जत पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ही सुटकेस ताब्यात घेतली असून हा मृतदेह महिलेचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेचे डोके आणि हाताचा भाग दिसून आल्याने हा मृतदेह महिलेचा असल्याचे उघडकीस आले. सदर मृतदेह धावत्या ट्रेनमधून नराधमाने फेकला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असून तांत्रिक तपासाच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
रायगड जिल्ह्यात नेमकं चाललंय काय?
शीना बोरा हिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पेणच्या गागोदे परिसरात टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. महिनाभरापूर्वीदेखील पेणमध्येच एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या हत्येचा अद्याप उलगडा झाला नसताना आता कर्जतमध्येही अशीच घटना समोर आल्याने रायगड जिल्ह्यात नेमकं । चाललंय काय? रायगड जिल्हा बेवारस मृतदेहांचे डम्पिंग झालेय का? असा सवाल केला जात आहे.