गोराईत सापडला मृतदेह; बॉक्समध्ये होते अवयव

गोराई येथील झाडाझुडपांनी वेढलेल्या खड्डय़ामध्ये दुपारी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चार ड्रममध्ये मृत व्यक्तीचे डोके, पाय, हात आणि धड आढळून आले. या प्रकरणी गोराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

गोराईच्या बाबरपाडा ते पिक्सी सी रिसॉर्ट शेफाली गाव परिसरात वाटसरूना तीव्र दुर्गंधी येऊ लागली. याची माहिती स्थानिकांनी गोराई पोलिसांना दिली. त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडपात चार ड्रम आणि प्लास्टिकची गोणी दिसली. पोलिसांनी ते ड्रम उघडले असता त्या चारही ड्रममध्ये मानवी अवयव दिसले. त्यामुळे पोलिसांना धक्काच बसला. एका ड्रममध्ये डोके आणि दोन हात, दुसऱ्या ड्रममध्ये धड, तिसऱ्या ड्रममध्ये मांड्या आणि चौथ्या ड्रममध्ये दोन्ही पाय ठेवलेले होते. धारदार शस्त्राने किंवा कटरच्या सहाय्याने शरीराचे अवयव वेगळे केले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.

एका ड्रममध्ये पोलिसाना जीन्स पॅन्ट आणि बूट आढळून आली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या चेहऱयाची ओळख पटणे कठीण आहे. पोलिसांनी शरीराचे सर्व अवयव जमिनीवर ठेवले. मृत व्यक्तीच्या हातावर आर.के. नावाचा टॅटू दिसला. त्या टॅटूवरून मृत व्यक्तीची पोलीस ओळख पटवत आहेत. पोलिसांनी मुंबईतून बेपत्ता असणाऱयाची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी भगवती रुग्णालयात पाठवला आहे. परिमंडळ-11चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पथक तयार केले आहे. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पथक करत आहे. पोलिसांनी ती चार ड्रम जप्त केली आहेत. ते ड्रम जुने आहेत. त्याचा वापर पाण्यासाठी केला असावा, अशी शक्यता आहे.