रत्नागिरीच्या रनपार समुद्रात बोट बुडाली, 16 जणांना वाचवण्यात यश

रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील परशुराम जयंती उत्सवानिमित्त रनपार गावात आलेले काही जण बोटीतून फिरण्यासाठी गेले होते. अचानक फिनोलेक्स जेटीच्या समोर त्यांची बोट बुडाली. यावेळी फिनोलेक्स कंपनीची नौका आणि पूर्णगड सागरी पोलीस ठाणे सागरी कवच अभियानाचे अंमलदार आणि बीएसएफ जवान यांच्या मदतीने बोटीवरील बुडणार्‍या 16 जणांना वाचवण्यात यश आले. मात्र बोट पाण्यात बुडाली. ही घटना आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.

पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सध्या सागरी कवच अभियान सुरू आहे. या माध्यमातून समुद्रकिनार्‍यावरती मोठ्या प्रमाणात गस्त सुरू आहे. ही गस्त सुरू असताना दुपारी 3 च्या सुमारास पावस खारवीवाडा येथील सरस्वती नावाची बोट घेऊन काहीजण फिरण्यासाठी रनपार खाडी परिसरात निघाले होते. यादरम्यान सागरी कवच अभियान सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या ही गोष्ट निदर्शनास आले, की फिनोलेक्स जेटीच्या समोर बोट बुडत आहे. त्यांनी तातडीने फिनोलेक्स कंपनीच्या दोन मैलांच्या सहाय्याने घटनास्थळी जाऊन बुडणार्‍या 16 जणांना वाचवले. बोट मात्र पाण्यात बुडाली. त्यानंतर त्या 16 जणांना सुखरूप किनार्‍यावरती आणण्यात आले.

हे मदतीला धावले

बोट बुडत असल्याचे पाहून फिनोलेक्स कंपनीचे सुरक्षा विभागाचे मेजर सुमेध कुलकर्णी यांनी तात्काळ पायलट नौका पाठवली. या मदत कार्यात फरीद तांडेल, शिवकुमार, सुरज सिंह, विजय वाघंब्रे, अपूर्ण जाधव, मुस्ताकिन शेख, ध्रुव आणि रघुनाथ घाटगे यांनी सहभाग घेत 16 जणांचे प्राण वाचवले.