
अपघात किंवा अन्य अत्यवस्थ रुग्णांना तत्काळ मुंबईत उपचार मिळावेत यासाठी रायगड जिल्ह्यात बोट अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात येणार होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य विभागाने सरकारकडे पाठवला आहे. मात्र सहा वर्षे उलटली तरी सरकारने यावर निर्णय घेतला नसून ही रुग्णवाहिका लालफितीत अडकली आहे.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे असून या ठिकाणी जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून उपचारासाठी रुग्ण येत असतात. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये येथूनही पुढील उपचारासाठी रुग्ण येत असतात. अनेकदा रुग्ण अत्यवस्थ झाले तर त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे न्यावे लागते. अलिबाग-मुंबई हे अंतर 120 किलोमीटर असल्याने अनेकदा वेळेत उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णावर जलदगतीने उपचार होण्यासाठी बोट रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य विभागाने मंत्रालयात पाठवला आहे, परंतु यावर अद्याप निर्णय न झाल्याने याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे.
या मिळणार सुविधा
अत्याधुनिक सुविधांनी युक्त असणाऱ्या या अॅम्ब्युलन्स बोटीमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत मेडिकल रूम, मेडिकल स्टोअर, ऑक्सिजन सिलिंडर, पिण्याचे पाणी, जनरल स्टोअर, वॉश रूम, टॉयलेटची सुविधा राहणार आहे. त्याचप्रमाणे ही बोट संपूर्ण वातानुकूलित राहणार आहे. किमान सात व्यक्तींची सोय आहे. त्याचप्रमाणे या बोटीवर जीपीएस ट्रेकिंग डिव्हाइसही बसवण्यात येणार आहे. तसेच जनरेटची सुविधाही देण्यात येणार आहे.