मुदत ठेवी मोडल्यास पालिका कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा! पालिका कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात मोर्चा

सुमारे दोन लाख कोटी रुपयांची विकासकामे, प्रकल्पकामे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली असून त्यासाठी मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी मोडल्या जाणार आहेत. मात्र विकासकामांच्या नावाखाली पालिकेच्या निधीची अशीच उधळपट्टी होत राहिली तर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा तर येईलच, पण कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्तीवेतन यासाठीही निधी शिल्लक राहणार नाही, अशी भीती व्यक्त करत ही उधळपट्टी थांबवा, अशी मागणी पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांनी आज आझाद मैदानात मोर्चा काढून केली.

मुंबई महापालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांनी आज विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात मोर्चा काढला. यावेळी विकासकामांच्या नावाखाली मुंबई महापालिकेच्या निधीची होणारी लूट थांबवा, घनकचरा विभागामध्ये काम करणाऱ्या 29 हजार 618 कामगारांना मालकी हक्काची घरे द्या, कामगारांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून कामगारांच्या वारसांना तातडीने नोकऱ्या द्या, अशी मागणी करण्यात आली. पालिकेच्या निरनिराळय़ा खात्यांमध्ये काम करणारे कामगार, कर्मचारी, अभियंते, परिचारिका, तंत्रज्ञ, शिक्षक, सुरक्षा रक्षक मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर, कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई यांनी केले.