
पीओपीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर मुंबई महापालिका ठाम असून पीओपीला पर्याय नसल्यामुळे मुंबईत पीओपी मूर्तीवर बंदी कायम राहणार आहे. मुंबई बाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. त्याचबरोबर मुंबईत शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या मंडपांनाच परवानगी दिली जाईल. त्यासाठी आवश्यक असलेली शाडूची माती आणि मंडपासारख्या इतर सुविधा मोफत पुरवल्या जातील, असे आज मुंबई महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, यंदाचा श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी मुंबई महापालिका प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेच्या एफ-दक्षिण विभागात पालिका उपायुक्त आणि गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे आणि मूर्तिकार संघटनांच्या समन्वय समितीची आज बैठक झाली. या बैठकीत मुंबईतील सुमारे 200 मूर्तिकार उपस्थित होते. यावेळी पीओपीला पर्याय देण्याची मागणी मूर्तिकारांच्या वतीने करण्यात आली. बैठकीत उपायुक्त राजेश ताम्हाणे यांच्यासह मुंबईतील विविध मूर्तिकार संघटनांचे पदाधिकारी, मूर्तिकार उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा
देशभरातील जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी पीओपीवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. त्यानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी मुंबई महापालिका आणि पोलिसांकडून केली जात आहे. पीओपीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मूर्तिकार संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेवर 5 मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे महापालिकेबरोबर सर्व मूर्तिकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे लक्ष मुंबई उच्च न्यायालय कोणता निर्णय देणार आहे, याकडे लागले आहे.
गणेशोत्सव मंडळांना का बोलावले नाही?
पालिका आणि मूर्तिकारांबरोबर आज झालेल्या बैठकीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱयांनाही बोलवायला हवे होते. मोठय़ा मंडळांच्या मोठय़ा मूर्तींच्या ऑर्डर्स असतात. त्यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे आम्ही मूर्ती बनवतो. उत्सवात होणारी उलाढाल आणि इतर खाचाखोचा आम्हाला माहीत नसतात. पालिकेच्या निर्णयामुळे एकूणच उत्सावावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या आज बैठकीला बोलावले असते तर बरे झाले असते. पालिका, सार्वजनिक मंडळे आणि मूर्तिकार यांच्यातील समन्वय अधिक चांगल्या प्रकारे झाला असता, अशी प्रतिक्रिया एका मूर्तिकाराने दिली.
- यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका मूर्तिकारांना मंडप तसेच पर्यावरणपूरक शाडू मातीदेखील मोफत देण्यात येत आहे.
- एक खिडकी योजनेतून मूर्तिकारांना देण्यात येणाऱ्या विविध परवानग्या वेळेत देण्यात येणार आहेत.
- मूर्तिकारांना उद्भवत असलेल्या समस्या प्रशासकीय विभाग (वॉर्ड ऑफिस) स्तरावर सोडवण्यात येणार आहेत.