पावसाळ्यात रस्त्यावर तुंबणाऱ्या पाण्याचा वेळीच निचरा करण्यासाठी दरवर्षी शेकडो पंप बसवण्यात येतात. त्यासाठी दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. गेल्या तीन वर्षांत भाडेतत्त्वावरील पंपासाठी तब्बल 238 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र पाणी तुंबण्याची समस्या आजही कायम आहे. पावसाळय़ात तुंबणाऱया पाण्याचा निचरा करण्यासाठी वापरात येणाऱया पंपांची संख्या कमी होणे अपेक्षित असताना दुपटीने वाढली आहे. 2022 आणि 2023 साली 380 पंप बसवण्यासाठी सुमारे 93 कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु 2022 सालात 55 आणि 2023 सालात 112 अधिक पंप लावल्याने याचा तब्बल 13 कोटींचा अतिरिक्त खर्च वाढला. त्यामुळे मागील तीन वर्षांमधील हा खर्च 106 कोटींवर पोहोचला आणि आता 2024 आणि 2025 सालासाठी विविध करांसह 132 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे पंपावरील खर्चाचा आकडा वाढतच आहे.
या वर्षी 481 ठिकाणी लागणार पंप
मुंबईत अतिवृष्टीमुळे सखल भागांमध्ये पाणी उपसा करणारे पंप लावले जातात. यंदाही शहर आणि उपनगरात मिळून 481 ठिकाणी पंप लावण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच त्यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करावा, एखादा पंप जर वेळेत व योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, असे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.